आयपीएस अधिकाऱ्याला उडविण्याचा कट रेतीमाफिया लतिफचाच
By Admin | Updated: July 1, 2014 00:55 IST2014-07-01T00:55:06+5:302014-07-01T00:55:06+5:30
आयपीएस अधिकारी तथा कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव सिंग यांना रेतीमाफिया लतिफ अन्सारी याच्या इशाऱ्यावरून उडविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती ट्रकचालकाच्या जबानीतून पुढे आली आहे.

आयपीएस अधिकाऱ्याला उडविण्याचा कट रेतीमाफिया लतिफचाच
पोलिसांना धडा शिकवा : आरोपींकडून माहितीवजा कबुली
नागपूर : आयपीएस अधिकारी तथा कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव सिंग यांना रेतीमाफिया लतिफ अन्सारी याच्या इशाऱ्यावरून उडविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती ट्रकचालकाच्या जबानीतून पुढे आली आहे. दरम्यान, रविवारपासून फरार असलेला कुख्यात लतिफ याला खापरखेडा पोलिसांनी सोमवारी दुपारी वलनी येथे जेरबंद केले. त्याला नंतर पारशिवनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवरील वलनी, रोहणा आणि पारडी रेतीघाटांवर लतिफचे वर्चस्व आहे. या रेतीघाटांमधून लतिफ खुलेआम रेतीचे अवैध उत्खनन करतो. ही रेती तो वलनी वेकोलिच्या बंद खदान परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवतो. वास्तवात ही जागा वेकोलिची असली तरी ती लतिफच्या दृष्टीने रेती साठविण्यासाठी अतिशय सुरक्षित आहे. कारण या भागात त्याची प्रचंड दहशत असल्यामुळे त्याच्याविरोधात कुणीही बोलत नाही. त्यामुळे त्याची चोरी अन् तस्करी बिनबोभाट सुरू असते. रेतीचोरी, हाणामारी आणि अनेक गंभीर गुन्हे ध्यानात घेता तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी लतिफला जानेवारीत तडीपार केले होते. मात्र, तो केवळ महिनाभरच अमरावती-अकोला भागात (कागदोपत्री!) वास्तव्याला होता.
या काळात तो वारंवार खापरखेडा, वलनी परिसरात दिसायचा. त्याने राजकीय वजन वापरून महिनाभरातच तडीपारचा आदेश रद्द करवून घेतला. यानंतर त्याने पुन्हा रेतीघाटावर अवैध उत्खनन, चोरी आणि रेतीची विक्री सुरू केली. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी कन्हानचे ठाणेदार (परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी) गौरव सिंग यांना रविवारी सकाळी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गौरव सिंग यांनी वेगवेगळी तीन पथके बनवून रेती चोरी करणाऱ्या वाहनांचा आपल्या कर्मचाऱ्यांसह पाठलाग सुरू केला.
ते ध्यानात आल्यामुळे आरोपी टिप्परचालक गोधनकर याने पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौरव सिंग यांचे वाहनच उडवून दिले. नशीब बलवत्तर म्हणून गौरव सिंग आणि इतर पोलीस कर्मचारी बचावले. या घटनेने पोलीस आणि महसूल यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण झाली. टिप्परचालक आरोपी मंगेश चंद्रभान गोधनकर (२५, रा. वलनी) याला घटनेच्या काही वेळातच पारशिवनी पोलिसांनी कलम ३०७, ३३२, ३७९ भादंविनुसार अटक केली. त्याच्या कबुलीजबाबातून गौरव सिंग यांना उडविण्याचा कट रेतीमाफिया लतिफ यानेच रचल्याचे उघड झाले. एकदा पोलिसांना धडा शिकवला की नंतर ते दूरच राहतात, असे लतिफ म्हणाला होता, असेही चौकशीतून उघड झाले.
या धक्कादायक माहितीनंतर पोलीस रविवारी रात्रीपासून लतिफचा शोध घेत होते. आज दुपारी तो वलनीत दडून असल्याची माहिती कळताच खापरखेडा पोलिसांनी कुख्यात लतिफच्या मुसक्या बांधल्या. त्यानंतर त्याला पारशिवनी पोलिसांच्या हवाली केले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या सायंकाळी पारशिवनीत पोहोचल्या. त्या स्वत:च रात्रीपर्यंत कुख्यात लतिफची चौकशी करीत होत्या. (प्रतिनिधी)