नदीतील खडकाचे अवैध खोदकाम
By Admin | Updated: December 12, 2014 00:28 IST2014-12-12T00:28:33+5:302014-12-12T00:28:33+5:30
सावनेर तालुक्यातील वाहणाऱ्या कन्हान नदीवरील टेंभूरडोह ते रायवाडी या दोन रेतीघाटादरम्यान असलेल्या महाकाय खडकाचे रेतीमाफियांनी अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली आहे.

नदीतील खडकाचे अवैध खोदकाम
संजय पोफळी - खापा
सावनेर तालुक्यातील वाहणाऱ्या कन्हान नदीवरील टेंभूरडोह ते रायवाडी या दोन रेतीघाटादरम्यान असलेल्या महाकाय खडकाचे रेतीमाफियांनी अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली आहे. रेती चोरी सुकर व्हावी, यासाठी हा खडक नष्ट करण्याचा सपाटा रेतीमाफियांनी चालविल्याचे जाणकारांनी सांगितले. सोबतच रेतीमाफियांनी नदीकाठी बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत उद्ध्वस्त केल्याने टेंभूरडोह गावाला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.
कन्हान नदीवरील बहुतांश रेतीघाटांचे तांत्रिक कारणांमुळे प्रशासनाने लिलाव केले नाही. शिवाय, त्या घाटामधून रेती उत्खननावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. एवढे असूनही या रेतीघाटांवर रेतीमाफियांनी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
दरम्यान, रेतीमाफियांनी याच नदीवरील रायवाडी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केल्याने या रेतीघाटात रेती शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे रेतीमाफियांनी आता टेंभूरडोह रेतीघाटाला लक्ष्य केले आहे.
रायवाडी व टेंभूरडोह हे दोन्ही रेतीघाट जवळजवळ असून, या घाटांच्या मध्ये नदीच्या पात्रात महाकाय खडक आहे. नदीचा प्रवाह या खडकाला अडून बाजून मार्ग काढत पुढे मार्गक्रमण करतो. टेंभुरडोह घाटातील रेती चोरी करण्यासाठी हा महाकाय खडक अडसर ठरत असल्याने रेतीमाफियांनी या खडकाचे अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली आहे. सदर खोदकाम रात्रीच्यावेळी जेसीबी मशीनद्वारे केले जात आहे.
हा प्रकार लक्षात येताच टेंभुरडोह येथील नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली. मात्र, रेतीमाफियांनी त्यांचा विरोध मोडीत काढला. यात स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कन्हान नदी टेंभूरडोह गावाजवळ काटकोनात वळते.
नदीच्या पुराचे पाणी या खडकाला अडून त्याचा मार्ग बदलते. त्यामुळे या गावाला पुराचा फारसा धोका उद्भवत नाही. रेतीमाफियांनी हा खडक नष्ट करायला सुरुवात केल्याने तसेच नदीच्या काठी असलेली पुरापासून संरक्षण करणारी सुरक्षा भिंत उद्ध्वस्त केल्याने भविष्यात या गावाला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
हा प्रकार महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र, संबंधित अधिकारी हा गंभीर प्रकार गांभीर्याने घेत नसल्याने ते रेतीमाफियांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर प्रकाराची तक्रार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.