मध्यवर्ती संग्रहालयातील ‘ट्रॉफीं’ची चौकशी
By Admin | Updated: September 7, 2014 00:55 IST2014-09-07T00:55:40+5:302014-09-07T00:55:40+5:30
विनापरवानगी शेकडो दुर्मिळ वन्यप्राणी व पक्ष्यांच्या ‘ट्रॉफी’ परस्पर नष्ट करणाऱ्या मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाविरुद्ध नागपूर वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. यात शनिवारी चौकशी अधिकारी सहायक

मध्यवर्ती संग्रहालयातील ‘ट्रॉफीं’ची चौकशी
वन विभागाची कारवाई : वाघ, बिबट्याच्या ‘ट्रॉफी’ परस्पर नष्ट
नागपूर : विनापरवानगी शेकडो दुर्मिळ वन्यप्राणी व पक्ष्यांच्या ‘ट्रॉफी’ परस्पर नष्ट करणाऱ्या मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाविरुद्ध नागपूर वन विभागाने कारवाई सुरू केली आहे. यात शनिवारी चौकशी अधिकारी सहायक वनसंरक्षक बी. एच. विरसेन, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते व सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. कोलनकर यांनी या प्राणिसंग्रहालयात जाऊन, येथे सध्या उपलब्ध असलेल्या वन्यप्राण्यांच्या ट्रॉफींचे मोजमाप करून, नष्ट करण्यात आलेल्या ट्राफींची माहिती घेतली. या दरम्यान अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्याची माहिती आहे.
उपराजधानीचे वैभव असलेल्या या संग्रहालयात वाघ, बिबट, चितळ, हरीण, सांबर व नीलगाय अशा विविध वन्यप्राण्यांसह दुर्मिळ पक्ष्यांच्या ‘ट्रॉफी’ संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. परंतु येथील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यापैकी शेकडो ट्रॉफींना बुरशी लागल्याने त्या खराब झाल्या होत्या. त्यावर प्रशासनाने वन विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, गत २००३ ते २००५ दरम्यान त्या सर्व ट्रॉफी नष्ट करून, त्यांची परस्पर विल्हेवाट लावली आहे. शहरातील ‘सृष्टी’ या संस्थेचे सदस्य विनीत अरोरा यांनी माहितीच्या अधिकारात संग्रहालयाकडून मागितलेल्या माहितीतून गत काही दिवसांपूर्वी त्याचा भांडाफोड झाला आहे. यात स्वत: संग्रहालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार खराब झालेल्या ट्रॉफींची विल्हेवाट लावण्यासाठी येथील प्रशासनाने गत २ जून २००५ मध्ये सहायक अभिरक्षक, प्राणीचर्मपूरक व आर्टिस्ट यांची एक संयुक्त समिती स्थापन करून, त्या समितीच्या अहवालानुसार संग्रहालयात एकूण ४४६ ट्रॉफी असून, त्यापैकी १६६ खराब झाल्या होत्या. त्यामध्ये विविध वन्यप्राण्यांचे १९ चामडे, ६ माऊंडेड हेड व ८४ बॉटल पेसीमेन्सचा समावेश होता. समितीने त्या सर्व ट्रॉफी नष्ट करण्याची शिफारस केली होती. त्यावर संग्रहालयाचे अभिरक्षक मधुकर कठाणे यांनी सर्व ट्रॉफी नष्ट करण्याची मंजुरी दिली. त्यानुसार ट्रॉफी नष्ट करण्यात आल्या. वन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, ही कारवाई सुरू केली आहे. (प्रतिनिधी)