लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेने १०० वर्षापेक्षा जास्त जुने असलेल्या रक्तचंदनाच्या झाडाकरिता एक कोटी रुपयांची अंतरिम भरपाई मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये जमा केली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. या झाडाचे अद्याप मूल्यांकन झालेले नाही. मूल्यांकनानंतर भरपाईची रक्कम दहा कोटींच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामधील खारशी येथील शेतकरी केशव शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांच्या जमिनीवर हे रक्तचंदनाचे झाड आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता शिंदे कुटुंबीयांची २.२९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी जमिनीच्या भरपाईचा अवॉर्ड जारी केला आहे. परंतु, रक्तचंदनासह इतर झाडे, विहीर व भूमिगत पाइपलाइनची भरपाई अद्याप निर्धारित करण्यात आली नाही. भूसंपादन अधिकाऱ्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन करून घेण्यासाठी वनविभागाला पत्र पाठविले आहे. याचिकाकर्त्यांनीही निवेदने दिली आहेत; पण गेल्या सात वर्षापासून या प्रकरणावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, शिंदे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आज पुढील सुनावणीया प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर अंतरिम भरपाईची रक्कम याचिकाकर्त्यांना अदा करण्याच्या मुद्द्यासंदर्भात आवश्यक आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.