काशीनगरच्या बाजाराला नागरिकांचा तीव्र विरोध : निरीक्षणास आलेल्या महापौरांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:28 IST2021-03-05T23:21:56+5:302021-03-05T23:28:02+5:30
Intense protest of citizens against Kashinagar market शहराच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील काशीनगर परिसरात बाजाराला स्थानिक नागरिकांनी तीव्र विराेध केला आहे. बाबुळखेडा येथील प्रस्तावित जागेचे निरीक्षण करायला गेलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांना नागरिकांच्या विराेधाचा सामना करावा लागला.

काशीनगरच्या बाजाराला नागरिकांचा तीव्र विरोध : निरीक्षणास आलेल्या महापौरांचा घेराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील काशीनगर परिसरात बाजाराला स्थानिक नागरिकांनी तीव्र विराेध केला आहे. बाबुळखेडा येथील प्रस्तावित जागेचे निरीक्षण करायला गेलेल्या महापाैर दयाशंकर तिवारी यांना नागरिकांच्या विराेधाचा सामना करावा लागला. रामेश्वरी, काशीनगर, द्वारकापुरी, सम्राट अशोक कॉलनी, हावरापेठ परिसरात लागणाऱ्या बाजारामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
काशीनगरच्या माैजा बाबुळखेडा येथील खसरा क्रमांक ५१/१, ५१/२ येथे पाच तुकड्यांमध्ये मनपाची जमीन आहे. विकास याेजनेंतर्गत ही जागा बाजारासाठी आरक्षित असून, येथे भाजीपाला बाजार भरविण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाचा आहे. मात्र वस्तीच्या मधे तुकड्यात असलेला भूखंड बाजारासाठी याेग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथे केवळ ३० फुटाचा रस्ता असल्याने दुकानदार राेडवर आणि लाेकांच्या घरासमाेर दुकान थाटून बसतात. यामुळे नागरिकांचे घरातून बाहेर निघणेही मुश्किल हाेते. त्यामुळे या जागेवर शाळा, रुग्णालय, उद्यान, क्रीडा संकुल, वाचनालय किंवा समाजभवन बनविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांची आहे. याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदनही सादर करण्यात आले. मात्र काही हाेत नसल्याचे लक्षात आल्याने असंताेष व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच शुक्रवारी निरीक्षणासाठी आलेल्या महापाैरांना घेराव करण्यात आला. यावेळी प्रभागातील चारही नगरसेवक उपस्थित हाेते. गेल्या वर्षी प्रभाग ३३ चे नगरसेवक मनाेज गावंडे, वंदना भगत, विशाखा बांते व भारती बुंदे यांनी या जागेवरील बाजाराचे आरक्षण रद्द करण्यासाठी तत्कालीन महापाैर संदीप जाेशी यांना निवेदन दिले हाेते. त्यांनीही दुकानदारांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले हाेते.
बुलडाेझरसमाेर उभ्या ठाकल्या महिला
महापाैर परतल्यानंतर ही जागा समतल करण्यासाठी मनपाचे कर्मचारी बुलडाेझर घेऊन आले. त्यामुळे संतापलेल्या स्थानिक महिला बुलडाेझरसमाेर उभ्या ठाकल्या. त्यांनी काम हाेऊ दिले नाही. जाेपर्यंत बाजाराच्या प्रकरणाचा निपटारा हाेत नाही, ताेपर्यंत काेणतेही काम करू न देण्याचा इशारा त्यांनी दिला. महिलांनी नारेबाजीही केली.
आंदाेलनाची तयारी
या वस्तीत पुन्हा बाजार भरला तर आंदाेलन करण्याचा इशारा संजय वर्मा, डॉ. विक्रम कांबळे, डॉ. मधुकर मून, भूपेंद्र बोरकर, दीपाली कांबळे, सुरेश मून, अमिय पाटील, भूषण भस्मे, शिरीष जंगले, रजनी पाटील, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, रवी रामटेके, अमित उपासक, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदींनी दिला.