बर्डीतील ते जीवघेणे स्पीड ब्रेकर तातडीने हटवण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 23:16 IST2025-11-07T23:16:43+5:302025-11-07T23:16:58+5:30
भानुसे यांनी सांगितले की, सीताबर्डी ते रहाटे कॉलनी हा उड्डाणपुल-रस्ता हलक्या वाहनांसाठी आहे. परंतु यानंतरही तेथून जड वाहनांची वाहतूक होत होती.

बर्डीतील ते जीवघेणे स्पीड ब्रेकर तातडीने हटवण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :
सीताबर्डी ते रहाटे कॉलनीदरम्यान उड्डाणपूल चढण्यापूर्वी जीवघेणे स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले. या स्पीड ब्रेकरवरून वाहने उसळून अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होत आहेत. यामुळे चक्क वाहने उडतानाच्या रील्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. लोकमतनेही हा मुद्दा लावून धरला. अखेर हे जीवघेणे स्पीड ब्रेकर तातडीने हटविण्याचे निर्देश बांधकाम विभागाचे विभागीय अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांनी दिलेत.
भानुसे यांनी सांगितले की, सीताबर्डी ते रहाटे कॉलनी हा उड्डाणपुल-रस्ता हलक्या वाहनांसाठी आहे. परंतु यानंतरही तेथून जड वाहनांची वाहतूक होत होती. यामुळे अपघाताच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे या रस्त्यावरील अपघात रोखण्यासह जड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तिथे स्पीड ब्रेकर लावण्याच्या मागणीचे पत्र दिले होते. त्या आधारावर तिथे ते स्पीड ब्रेकर तयार केल्याचे भानुसे यांनी सांगितले. परंतु ज्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर तयार केले ते तातडीने हटविण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे. मात्र ते बसवताना ठरलेल्या मापदंडानुसार आणि वाहन चालकांची सुरक्षा पाहूनच ते बसवले जाईल. वाहनचालकांना सवय व्हावी म्हणून टप्प्याटप्प्याने तिथे स्पीड ब्रेकर लावण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ३ मिमीच्या थम्रो प्लाटीकच्या पट्या, आठवड्याभरानंतर ६ मिमी थम्रो प्लाटीकच्या पट्ट्या मारण्यात येईल. आठवड्याभरानंतर तीन मीटर लांबिचा आणि १० सेंं.मी. उंच असा गतिरोधक तयार करण्यात येणार असल्याचेही भानुसे यांनी स्पष्ट केले.