दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 23:33 IST2019-10-07T23:31:06+5:302019-10-07T23:33:30+5:30
निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे.

दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघाकरिता निवडणूक होत आहे. याकरिता १६०० वर वाहनांची गरज आहे. यात ७०० वर सरकारी वाहने असून, उर्वरित वाहने खासगी घेण्यात येणार आहे. वाहनासाठी १५० वर विभागांना पत्र पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत ३०० च्या जवळपासच वाहने जमा झाली. अनेक विभागाने अजूनही वाहन दिलेले नाही. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने निवडणूक विभागाच्या पथकाने थेट वाहन जप्तीची मोहीम सुरू केली आहे. काही वाहनातून चालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना उतरवून जप्त करण्यात आले. स्मरणपत्र दिल्यावरही वाहन दिले नसून काहींनी तर वाहन लपवून ठेवले आहे. निवडणूक विभागाचे कर्मचारी गेल्यास वाहन नसल्याचे उत्तर देण्यात येते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे आता वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.