थायलंडच्या बुद्धमूर्तीची दीक्षाभूमीत स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 20:17 IST2022-12-01T20:16:12+5:302022-12-01T20:17:29+5:30
Nagpur News थायलंडतर्फे भेट मिळालेल्या तथागत गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती गुरुवारी दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्तूपात समारंभपूर्वक स्थापित करण्यात आली.

थायलंडच्या बुद्धमूर्तीची दीक्षाभूमीत स्थापना
नागपूर : थायलंडतर्फे भेट मिळालेल्या तथागत गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती गुरुवारी दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्तूपात समारंभपूर्वक स्थापित करण्यात आली. साडे ९ फूट उंचीची व ४०० किलो वजनाची अष्टधातूची ही मूर्ती आहे. दुसरी बुद्धमूर्ती ही साडेसात फुटाची असून ती काटोल रोडवरील बुद्धवनला भेट मिळाली आहे. गुरुवारी सकाळी मिरवणुकीने या दोन्ही बुद्धमूर्ती दीक्षाभूमीत आणण्यात आल्या. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजुर्न सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. थायलंड बुद्धिस्ट असोसिएशनचे महासचिव डॉ. महाकाई यांच्या नेतृत्वात ३० भिक्खू आणि थायलंडचे दानदाते उपस्थित होते.
यावेळी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, समितीचे सदस्य विलास गजघाटे, एल. आर. सुटे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे उपस्थित होते.
मिरवणुकीवर पुष्पवर्षाव
पंचशील नगर ते दीक्षाभूमीपर्यंत बुद्धप्रतिमेवर पुष्पवर्षाव करीत ही मिरवणूक दीक्षाभूमी येथे पोहोचली. ‘बुद्धमं शरणं गच्छामि’चा स्वर निनादत असताना शहरवासीयांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण स्मारक समितीचे अध्यक्ष इंद्रपाल वाघमारे, युवा भीम मैत्री संघाचे अध्यक्ष दीपक वासे, विक्रांत गजभिये, बुद्धिमान सुखदेवे, विशाल जनबंधू, विनोद सुदामे, हितेश उके, ए. भिवगडे यांच्यासह समता सैनिक दल, भिक्खू संघ थायलंडचे भिक्खू संघ, उपासक-उपासिका आणि आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले.