इन्स्पेक्टर दया नायक निलंबित
By Admin | Updated: July 3, 2015 02:59 IST2015-07-03T02:59:11+5:302015-07-03T02:59:11+5:30
वर्षभरापुर्वी बदली होऊनही नागपूर परिक्षेत्रात रुजू न झाल्यामुळे वादग्रस्त पोलीस अधिकारी (एन्काउंटर स्पेशालिस्ट) ...

इन्स्पेक्टर दया नायक निलंबित
डीजींचे आदेश : नागपुरात रुजू न झाल्याने कारवाई
नागपूर : वर्षभरापुर्वी बदली होऊनही नागपूर परिक्षेत्रात रुजू न झाल्यामुळे वादग्रस्त पोलीस अधिकारी (एन्काउंटर स्पेशालिस्ट) दया नायक याला गुरुवारी निलंबित करण्यात आले. बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ केल्यामुळे एखाद्या नामवंत तेवढ्याच वादग्रस्त पोलीस अधिका-याला निलंबित करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे पोलीस यंत्रणेत चर्चेला उधान आले आहे.
अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांसोबतच अनेक खतरनाक टोळळ्यातील गुंडांना यमसदनी धाडणा-या दया नायकला काही वर्षांपुर्वी पोलीस दलासह सामान्य नागरिकांनीही डोक्यावर घेतले होते.
एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्याचा उदोउदो होत होता. याच दरम्यान तो एका टोळीतील गुंडांकडून दुस-या टोळीतील गुंडांचा गेम करण्यासाठी सुपारी घेत असल्याची जोरदार चर्चावजा आरोप झाले आणि दया नायक वादग्रस्त झाला. त्याची चौकशी झाली आणि त्याला निलंबितही करण्यात आले. दोन वर्षांपुर्वी तो पुन्हा नोकरीत रुजू झाला. गेल्या वर्षी त्याची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली. मात्र, वरिष्ठांशी लागेबांधे आणि ब-यापैकी राजकीय पाठबळ असल्यामुळे दया नायक नागपूर परिक्षेत्रात रुजू व्हायला तयार नव्हता. वारंवार सूचनापत्र, आदेश देऊन तो नागपूरात यायला तयार नसल्यामुळे अखेर पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी गुरुवारी त्याच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
पोलीस यंत्रणेत खळबळ
मुख्यमंत्री नागपूरचे, गृहखातेही मुख्यमंत्र्यांकडेच असताना अनेक पोलीस अधिकारी नागपूर-विदर्भात यायला तयार नाहीत. गेल्या महिन्याभरात झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यातून त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अनेकांनी आपली नागपूर-विदर्भात झालेली बदली रद्द करून घेतली. लोकमतने त्याबाबतही वृत्तही प्रकाशित केले होते. त्याची गृहखात्याकडून गांभिर्याने दखल घेतली गेली. याच पार्श्वभूमीवर दया नायकचे निलंबन झाल्याची माहिती आहे.