उखडलेल्या रस्त्यांचा चौकशी अहवाल लांबणीवर
By Admin | Updated: August 11, 2016 02:21 IST2016-08-11T02:21:59+5:302016-08-11T02:21:59+5:30
शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांना याचा जाब विचारत आहे.

उखडलेल्या रस्त्यांचा चौकशी अहवाल लांबणीवर
१५ दिवसात चौकशी अशक्य : शुक्रवारच्या सभेत अहवाल नाही
नागपूर : शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांना याचा जाब विचारत आहे. यामुळे सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार उखडलेल्या रस्त्यांची चौकशी करण्यासाठी समिती गठित करून पुढील सभागृहात अहवाल सादर केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु अद्याप शहरातील रस्त्यांची चौकशी पूर्ण व्हायची असल्याने चौकशी अहवाल लांबणीवर पडला आहे.
शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा अहवाल सादर केला जाईल. समितीमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, अशी आशा होती. परंतु अद्याप झोननिहाय चौकशी सुरूच आहे. समितीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांच्या नेतृत्वात गेल्या गुरुवारी चौकशीला सुरुवात केली. परंतु सर्वच झोनमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते उखडलेले आहेत. समिती या संदर्भात काय भूमिका घेते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन वर्षात डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले आहेत. काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यात काही प्रस्तावित सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती शक्य नसल्याचे सांगण्यात आले. सिमेंट रस्त्यांच्या कंत्राटदारांना खड्डे बुजवण्यास सांगण्यात आले आहे. सुरुवातील झोनच्या सहायक आयुक्तांना झोनमधील रस्त्यांची चौकशी करून उखडलेल्या रस्त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. समितीकडूनही सखोल चौकशी होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या चौकशीतून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही.