खासगी इस्पितळांतील रुग्णांना फटका
By Admin | Updated: November 13, 2016 02:39 IST2016-11-13T02:39:25+5:302016-11-13T02:39:25+5:30
५०० व १००० नोटा स्वीकारण्याच्या मुदतवाढीला नकार : रोख व्यवहार खोळंबले

खासगी इस्पितळांतील रुग्णांना फटका
५०० व १००० नोटा स्वीकारण्याच्या मुदतवाढीला नकार : रोख व्यवहार खोळंबले
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
शासकीय रुग्णालयाला ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याला १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी खासगी इस्पितळांना ती नाकारण्यात आली आहे. यामागे बोगस रुग्ण दाखवून काळा पैसा पांढरा करण्याचे कारण सांगितले जात आहे. परिणामी, शनिवारी बहुसंख्य खासगी इस्पितळांनी या नोटा घेण्यास नकार दिला. याचा फटका सामान्य रुग्णांना बसला असून तातडीच्या शस्त्रक्रिया व डिस्चार्ज घेणारे रुग्ण अडचणीत आले आहेत.
आरोग्य सेवा संचालनालयाने ९ नोव्हेंबर रोजी एक पत्र काढून शासकीय सोबतच खासगी इस्पितळांनी ११ नोव्हेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना सर्व खासगी इस्पितळांना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतांश इस्पितळांनी या नोटा स्वीकारल्या. ही मुदत संपण्याच्या दिवशीच शासकीय रुग्णालयांना १४ नोव्हेंबरपर्यंत या नोटा घेण्याच्या नव्या सूचना देण्यात आल्या.
या सूचना खासगी इस्पितळांना लागू असल्याचे आरोग्य सेवा संचालनालय शनिवार दुपारी २ वाजेपर्यंत म्हणत होते. या संदर्भात अधिकृत सूचना देण्यासाठी संचालनालयाने पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी खासगी इस्पितळांना वाढीव मुदत देण्यास नकार दिला.