‘त्या’ वृद्धांवर उपचाराला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST2021-04-27T04:09:13+5:302021-04-27T04:09:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : सावनेर-कळमेश्वर मार्गालगत असलेल्या स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ४० वृद्धांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, ...

‘त्या’ वृद्धांवर उपचाराला सुरुवात
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : सावनेर-कळमेश्वर मार्गालगत असलेल्या स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ४० वृद्धांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, महसूल व आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी त्या वृद्धांची तपासणी केली. यातील सहा वृद्धांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले असून, सात जणांवर काेविड केअर सेंटरमध्ये उपचाराला सुरुवात केली आहे. शिवाय, २७ वृद्धांना वृद्धाश्रमात गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
विवेकानंद वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्व व्यक्ती या ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या आहेत. काेराेना संक्रमण काळात त्यांच्याकडे प्रशासनासह इतर कुणाचेही लक्ष नव्हते. त्यातच येथील काही वृद्धांना काेराेनाची लागण झाल्याचेही आढळून आले हाेते. या संदर्भात लाेकमतमध्ये बुधवारी (दि. २१) ‘कोरोना काळात आप्तांची चिंता, वृद्धाश्रमात आजी आजोबा एकाकी’ तसेच गुरुवारी (दि. २२) ‘सावनेरच्या स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील २९ वृद्ध कोरोनाबाधित’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले हाेते. या वृत्तांची दखल तहसीलदार सतीश मिसाळ, डॉ. अमित बाहेती, डॉ. संदीप गुजर यांच्यासह अधिकाऱ्यांनी साेमवारी (दि. २६) या वृद्धाश्रमाला भेट दिली.
यावेळी अधिकाऱ्यांनी प्रत्येक वृद्धाशी संपर्क साधत चर्चा केली आणि त्यांच्या आराेग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. या वृद्धाश्रमातील ४० व्यक्ती काेराेना संक्रमित असल्याचे आधीच स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे डाॅक्टरांनी सर्व वृद्धांची रक्त तपासणी करीत एक्स रे घेतले. यात सात जणांना पुढील उपचारासाठी नागपूरला भरती करण्यासाठी तर सहा जणांना सावनेर शहरातील काेविड केअर सेंटरमध्ये पाठविण्याची तातडीने व्यवस्था केली. उर्वरित २७ वृद्धांची वद्धाश्रमातच विलगीकरणाची साेय करून त्यांच्या औषधाेपचाराची व्यवस्था केली. अधिकाऱ्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केल्याने तसेच तपासणी करून औषधांची साेय करून दिल्याने एकाकी जीवन जगणाऱ्या त्या वृद्धांना दिलासा मिळाला आहे.