विवेकानंद स्मारकातील माहिती केंद्र कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:10+5:302021-01-13T04:17:10+5:30
युवा दिवस विशेष नागपूर : १२ जानेवारी हा युवा दिन, अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. नागपूर मनपाने सुमारे ३ ...

विवेकानंद स्मारकातील माहिती केंद्र कुलूपबंद
युवा दिवस विशेष
नागपूर : १२ जानेवारी हा युवा दिन, अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. नागपूर मनपाने सुमारे ३ कोटी रुपये खर्चून स्वामीजींचे विशाल स्मारक बनवले आहे. युवा दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे विचार ऐकण्यासाठी १० रुपयांचे तिकीट काढून अंबाझरी तलाव परिसरातील स्मारकात दाखल झालो. पण, केंद्राजवळचे दोन्ही गेट बंद होते. ते नेहमीच बंद असल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले. विनंतीवरून त्याने गेटचे कुलूप उघडले. आतील भिंतीवर स्वामीजींच्या प्रतिमा आणि एलसीडी स्क्रीन होता. याच माध्यमातून स्वामीजींचे विचार ऐकण्याची योजना होती, मात्र दोन वर्षांपासून ते बंद आहे.
स्वामीजी म्हणायचे, काम करण्याची प्रतिज्ञा घ्याल तेव्हाच ते पूर्ण करा, अन्यथा लोकांचा विश्वास उडून जातो. मनपाने स्वामीजींचे विशाल स्मारक बनविण्याची योजना आखली, मात्र, ती पूर्णत्वास नेली नाही, त्यामुळे मनपानेच आता स्वामीजींची ती शिकवण आठविण्याची गरज आहे. मंगळवारी स्वामीजींची जयंती असतानाही कुणालाही या स्मारकाची आठवण येऊ नये, हे आश्चर्य आहे.
ही होणार होती सुविधा
स्वामी विवेकानंदांचे विचार हिंदी आणि इंग्रजी भाषेतून युवकांना आणि नागरिकांना हेडफोन लावून ऐकता यावे, यासाठी सुविधा होणार होती. टच स्क्रीनचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. असे १४ स्क्रीन येथे लावण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांपासून ते बंद आहेत. आजही शेकडोंच्या संख्येने युवक येथे येतात, मात्र, त्यांना निराश होऊन परतावे लागते. येथील स्वच्छतेची जबाबदारी कंत्राटदाराकडे असली तरी नहरात साचलेले शेवाळ, जागोजागी फुटलेल्या टाईल्स, अस्वच्छता या बाबी नजरेत खुपण्यासारख्या आहेत.
...
यासंदर्भात जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला. कंत्राटदार नाना गोरमारे म्हणाले, सप्टेंबर-२०२० मध्ये त्यांना फक्त स्मारक परिसराची जबाबदारी सोपविण्यात आली. माहिती केंद्रातील स्क्रीन आणि ऑडिओ सिस्टीममध्ये तांत्रिक दोष असल्याने ती जबाबदारी नव्हती. नव्या महापौरांनी लवकरच केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे कंत्राटदाराने सांगितले. माहिती केंद्र गार्डन विभागाकडे असल्याचे कळल्याने विभागाचे सुप्रिंटेंडेंट अमोल चोरपगार यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, स्मारक परिसराची उभारणी मनपाच्या प्रकल्प विभागाने केली होती. आपल्याकडे फक्त सौंदर्यीकरणाचे काम होते. पाच लाख रुपयांचा खर्च करून ते पूर्ण केले. अखेर प्रोजेक्ट विभाग आणि इलेक्ट्रिक विभागाकडे विचारणा केली. लॉकडाऊनमुळे हे केंद्र सुरू केले नसून, लवकरच सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.