नागपूर ‘एमआयडीसी’च्या १४७ भूखंडांवरील उद्योग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:10 IST2018-05-16T22:10:40+5:302018-05-16T22:10:52+5:30
नागपूर ‘एमआयडीसी’ परिसरात असलेल्या एकूण औद्योगिक भूखंडांपैकी १४७ ठिकाणचे उद्योग मागील १५ महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र इतर १०७ उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली हा प्रश्न कायम आहे. माहितीच्या अधिकारातून बंद उद्योगांची ही बाब समोर आली आहे.

नागपूर ‘एमआयडीसी’च्या १४७ भूखंडांवरील उद्योग बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ‘एमआयडीसी’ परिसरात असलेल्या एकूण औद्योगिक भूखंडांपैकी १४७ ठिकाणचे उद्योग मागील १५ महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र इतर १०७ उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली हा प्रश्न कायम आहे. माहितीच्या अधिकारातून बंद उद्योगांची ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘एमआयडीसी’कडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत नागपूर ‘एमआयडीसी’तील किती उद्योग बंद पडले, बंद उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली, ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून सरकारला किती महसूल मिळाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ‘एमआयडीसी’मध्ये एकूण १६७३ भूखंड आहेत. यातील ४४ भूखंड रिकामे आहेत. एकूण संख्येपैकी १३७० औद्योगिक भूखंड आहेत. सद्यस्थितीत यातील ११५२ भूखंडांवर उद्योग सुरू आहेत. १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत एकूण १४७ भूखंडांवरील उद्योग बंद पडले. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. दोन उद्योगांविरोधात न्यायालयीन खटले सुरू आहेत. दरम्यान, या कालावधीत सरकारला ‘एमआयडीसी’पासून ५ कोटी ७३ लाख ७५ हजार ३३६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
बंद उद्योगाचंी यादी कुणाकडे ?
आश्चर्याची बाब म्हणजे ‘एमआयडीसी’च्या भूखंडांवर बंद पडलेल्या उद्योगांची कुठलीही यादी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारात तसे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. जर ‘एमआयडीसी’कडे बंद पडलेल्या उद्योगांची यादी नाही, तर ती आहे कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.