स्वदेशी गाेवंशाच्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांती हाेईल

By निशांत वानखेडे | Updated: March 4, 2025 18:30 IST2025-03-04T18:27:57+5:302025-03-04T18:30:03+5:30

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन : ‘माफसू’चा १२ वा दीक्षांत समारंभ समारंभ थाटात

Indigenous cattle IVF technology will revolutionize agriculture | स्वदेशी गाेवंशाच्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांती हाेईल

Indigenous cattle IVF technology will revolutionize agriculture

निशांत वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वदेशी गाेवंशाच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी माफसूद्वारे उपयाेग हाेत असलेले इन विट्रो फर्टिलाइजेशन (आईवीएफ) आणि भ्रूण प्रत्यारोपण (ईटीटी) या तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडेल, असा विश्वास राज्याचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभाचे मंगळवारी आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, हाेमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती पद्मविभूषण डाॅ. अनिल काकाेडकर, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुपालन, डेयरी व मत्स्यपालन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्यपालाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व कुलसचिव मोना ठाकूर उपस्थित हाेते.
माफसूमध्ये २०२१ पासून आयव्हीएफ तंत्रज्ञानाने ४७ वासरे जन्मली आहेत आणि भ्रूण प्रत्याराेपण तंत्राद्वारे ९७ गायींची गर्भधारणा करण्यात यश आले आहे. हे यश नवाेन्मेषी संशाेधनाची ठाेस पावती असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले. माफसूने शिक्षण आणि संशाेधनाच्या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाशी समन्वय करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन शिक्षण धाेरणाने कृषी शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडेल, असा दावा त्यांनी केला. हे धाेरण बहुविषय व सर्वसमावेशक शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले. राज्यपालांनी यावेळी सहकारी दुध संघ व संस्थांचे महत्त्व अधाेरेखित केले. राज्यातील दीड लाखाहून अधिक दुग्ध सहकारी संस्थांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार मिळाल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशाेधन व नवकल्पनांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता व कार्यक्षमता सुधारण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. यासह मत्स्य व्यवसायालाही आधुनिक तंत्रज्ञानाशी जाेडून महाराष्ट्र व भारताला मत्स्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हवामान बदल प्रतिराेधक पशुधनाचा विकास आवश्यक : डाॅ. काकाेडकर

वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान आणि दुष्काळ अशा हवामान बदलाचे दुष्परिणाम मानवांसह पशुधनावर हाेताना दिसत आहे. या बदलासाठी पशुपालन क्षेत्राला प्रतिकारक्षम बदनविण्याचे आवाहन आपल्यासमाेर आहे. तेव्हा पशुधनाच्या हवामान बदल प्रतिराेधक प्रजाती विकसित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डाॅ. अनिल काकाेडकर यांनी केले. पशु आराेग्याचा थेट संबंध मानवी कल्याणाशी आहे, हे काेराेना काळात समजून चुकले आहे. त्यामुळे चांगल्या पशु आराेग्य सेवा, राेग नियंत्रण प्रणाली आणि शाश्वत पशुपालन पद्धती विकसित करणे गरजेचे आहे. गगनचुंबी इमारती, साॅफ्टवेअरचा विकास व औद्याेगिक वाढ हे प्रगतीचे मानक नाही, तर प्रत्येक नागरिकाचे व ग्रामीण भागातील लाेकांचे जीवनमान किती उंचावले, यावर अवलंबून आहे. शाश्वत उपजिविका, आर्थिक स्वावलंबन व प्रत्येक कुटुंबाला सकस पाेषण आहार व सन्मानजनक जीवन मिळणे समृद्धीचे लक्षण हाेय. त्यामुळे विज्ञान आणि पशुपालन यांचा समन्वय भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी ठरेल, असा विश्वास डाॅ. काकाेडकर यांनी व्यक्त केला.

पशु व मत्स्य उत्पादन वाढीसाठी सरकार कटिबद्ध : पंकजा मुंडे
विद्यापीठ पशु आणि मत्स्य विज्ञानात जागतिक आघाडीवर राहील यासाठी पायाभूत सुविधा, संशोधन आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली. संबंधित क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणाऱ्या उपक्रमांना सरकार सदैव पाठिंबा देत राहील. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन क्षेत्राला प्रगत करून तरुण व्यावसायिक सफल होऊ शकतील आणि नवनिर्मिती करू शकतील, अशी परिसंस्था निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

७०३ विद्यार्थ्यांना पदवीदान, साहिल अव्वल

माफसूच्या दीक्षांत समारंभात ७०३ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. यात पशुवैद्यक विज्ञान पदवीचे ३८०, मत्स्य विज्ञान पदवीचे ५७, दुग्ध तंत्रज्ञानचे ५३, पदव्युत्तर पशुवैद्यक विज्ञानचे २०५, पदव्युत्तर दुग्ध तंत्रज्ञानचा १ आणि पीएचडीचे ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय ३० सुवर्ण, ८ रजत व राेख पुरस्कारही प्रदान करण्यात आले. नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी साहील हा ६ सुवर्ण व ३ रजत पदकासह अव्वल ठरला. मुंबईची आस्था मेहताने २ सुवर्ण व राेख पारिताेषिक, तर क्रांती सिन्हा या विद्यार्थिनीने २ सुवर्ण पदक पटकावले.

Web Title: Indigenous cattle IVF technology will revolutionize agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.