विदर्भ विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:51+5:302021-08-21T04:11:51+5:30
सरकारने दिले पूर्णवेळ सदस्य सचिव : दीपक सिंगला यांची नियुक्ती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ विकास मंडळाला ...

विदर्भ विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनाचे संकेत
सरकारने दिले पूर्णवेळ सदस्य सचिव : दीपक सिंगला यांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ विकास मंडळाला तब्बल दीड वर्षानंतर पूर्णवेळ सदस्य सचिव मिळाले. शुक्रवारी राज्य सरकारने आयएएस दीपक सिंगला यांची या पदावर नियुक्ती करीत विदर्भासह तिन्ही विकास मंडळे लवकरच पुनरुज्जीवित करण्याचे संकेत दिले.
विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी गठित विकास मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपला आहे. संविधानाचे कलम ३७१ (२) अन्वये गठित या मंडळांचा कार्यकाळ पुढे वाढविण्याबाबत राज्य सरकारने कुठलाही पुढाकार घेतला नाही. विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरून तिन्ही मंडळांचा कार्यकाळ विस्तार राजकीय पेचात अडकला होता. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून राज्य व केंद्र सरकार यासंदर्भात उदासीन असल्याची बाब उघडकीस आणली होती. राज्य सरकारने यानंतर मराठवाडा विकास मंडळ सदस्य सचिवांची नियुक्ती केली. आता विदर्भ विकास मंडळाच्या सदस्य सचिव पदावर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट २०२० ते ९ जुलै २०२१ पर्यंत मनीषा खत्री या या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळीत होत्या. दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मंडळाचा कार्यकाळ संपूर्ण एक वर्षापेक्षाही अधिक काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत मंडळाच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रपतींचा हस्तक्षेप आवश्यक झाला आहे.