नवरात्रीच्या सुरूवातीपासून भारतीय रेल्वेचा प्रवाशांना पाणीदार दिलासा
By नरेश डोंगरे | Updated: September 20, 2025 22:59 IST2025-09-20T22:58:20+5:302025-09-20T22:59:13+5:30
सोमवारपासून नवे दर लागू : एक आणि अर्धा लिटर पाण्याची किंमत एक रुपयाने घटवली

नवरात्रीच्या सुरूवातीपासून भारतीय रेल्वेचा प्रवाशांना पाणीदार दिलासा
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नवरात्रींची चाहूल लागल्याने देशभरात रेल्वे गाड्यांमध्ये गर्दीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने प्रवाशांना पाणीदार दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना बाटली बंद पिण्याचे पाणी 'रेल नीर' बाजारपेठेतील दुसऱ्या कंपन्यांच्या बाटली बंद पाण्याच्या तुलनेत कमी किंमतीत उपलब्ध करून दिले जाते. दुसऱ्या नामांकित कंपन्या एक लिटर बाटलीबंद पाणी २० रुपयात, तर अर्धा लिटर पाण्याची बाटली १० रुपयात विकतात. रेल्वेकडून मात्र रेल नीरची एक लिटरची बाटली १५ रुपयांत तर अर्धा लिटर बाटली ९ रुपयात मिळत होती. आता नवीन निर्णयानुसार, पुन्हा ती स्वस्त करण्यात आली. त्यानुसार, १५ रुपयांची एक लिटरची बाटली आता १४ रुपयात तर अर्धा लिटर पाण्याची बाटली १० रुपयांऐवजी ९ रुपयांत मिळणार आहे.
घट स्थापनेच्या दिवशी अर्थात २२ सप्टेंबर २०२५ पासून हे नवीन दर रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर लागू होणार आहे.
मनाई असूनही विक्री
विशेष उल्लेखनीय म्हणजे, रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये फक्त 'रेल नीर' अर्थात रेल्वेच्याच पाण्याच्या बाटल्या विकण्याची सक्ती आहे. दुसऱ्या कंपनीच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीस मनाई आहे. मात्र, अनेक वेंडर्स कमिशन जास्त मिळते म्हणून 'रेल नीर' सोबत दुसऱ्या कंपनीच्याही पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री करतात. एवढेच नव्हे तर 'कुलिंग चार्ज'च्या नावाखाली प्रवाशांकडून प्रत्येक बाटलीवर एक किंवा दोन रुपये अतिरिक्त वसूल करतात.