‘जीएसटी’च्या विरोधात २६ फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:25+5:302021-02-09T04:10:25+5:30
नागपूर : ‘जीएसटी’च्या विरोधात ‘कॅट’तर्फे (कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) २६ फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंद आंदोलन पुकारण्याची घोषणा ...

‘जीएसटी’च्या विरोधात २६ फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंद आंदोलन
नागपूर : ‘जीएसटी’च्या विरोधात ‘कॅट’तर्फे (कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) २६ फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंद आंदोलन पुकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘कॅट’च्या तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया व राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी ही माहिती दिली.
तर ‘एटवा’कडूनदेखील (ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन) याचे समर्थन करण्यात आले असून देशभरात चक्काजाम करण्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी केली.
‘कॅट’च्या व्यापारी संमेलनात देशभरातील सर्वच राज्यांमधील दोनशेहून अधिक प्रमुख व्यापारी पदाधिकारी सहभागी झाले आहेत. ‘जीएसटी कौन्सिल’ने ‘जीएसटी’ला स्वत:च्या फायद्यासाठी कठोर केले असल्याचा आरोप लावण्यात आला. ‘जीएसटी’ पूर्णत: अयशस्वी प्रणाली आहे. ‘जीएसटी’च्या मूळ स्वरुपात बदल करण्यात आला आहे. सर्व राज्य सरकार स्वत:च्या स्वार्थाचा विचार करत असून त्यांना करप्रणाली सुलभीकरणाची काहीच चिंता नाही. देशातील व्यापारी व्यापार करण्याऐवजी दिवसभर ‘जीएसटी’चे पालन करण्यातच लागले असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही योग्य बाब नाही. त्यामुळे ‘जीएसटी’च्या सध्याच्या स्वरुपावर नवीन पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. चार वर्षांत जवळपास ९३७ वेळा संशोधन केल्यानंतर ‘जीएसटी’चा मूळ आराखडाच बदलण्यात आला आहे. वारंवार ‘कॅट’ने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारत व्यापार बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे, असे भरतिया व खंडेलवाल यांनी सांगितले.