तापमानवाढीस कारणीभूत देशांमध्ये भारत पाचवा; हरितवायूचे उत्सर्जन नियंत्रणाबाहेर
By निशांत वानखेडे | Updated: April 2, 2023 08:00 IST2023-04-02T08:00:00+5:302023-04-02T08:00:07+5:30
Nagpur News जगाच्या एकूण तापमानवाढीत भारताने ०.०८ अंश सेल्सिअसची भर घातली असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरलेल्या जगातील १० देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण प्रमाणात हे याेगदान ४.८ टक्के आहे.

तापमानवाढीस कारणीभूत देशांमध्ये भारत पाचवा; हरितवायूचे उत्सर्जन नियंत्रणाबाहेर
निशांत वानखेडे
नागपूर : जागतिक तापमानवाढ ही जगासाठी नाही तर आपल्या ग्रहासाठीच समस्या ठरली आहे. ही समस्या निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचेही याेगदान आहे. जगाच्या एकूण तापमानवाढीत भारताने ०.०८ अंश सेल्सिअसची भर घातली असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरलेल्या जगातील १० देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण प्रमाणात हे याेगदान ४.८ टक्के आहे.
युरोप आणि युनायटेड स्टेट्समधील संशोधकांनी १८५० पासून कार्बन डायऑक्साइड (CO2), मिथेन (CH4) आणि नायट्रस ऑक्साइड (N2O) सारख्या हरितगृह वायूंमुळे झालेले जागतिक तापमानवाढीसाठी राष्ट्रीय योगदानाची गणना केली. १८५१ ते २०२१ पर्यंत भारतातील कार्बन, मिथेन व नायट्रस ऑक्साइड या वायूंच्या उत्सर्जनामुळे अनुक्रमे ०.०४ अंश सेल्सिअस, ०.०३ अंश सेल्सिअस आणि ०.००६ अंश सेल्सिअस जागतिक तापमान वाढ झाली आहे. या याेगदानासह टाॅप १० देशांत भारत पाचव्या क्रमांकावर असल्याचे वैज्ञानिक डाटामध्ये प्रकाशित संशाेधनात आढळून आले आहे. हा डेटासेट हवामान धोरण आणि बेंचमार्किंगची माहिती देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- अभ्यासाच्या विश्लेषणानुसार मिथेन ०.४१ अंश सेल्सिअस व एन२ओ ०.०८ अंश सेल्सिअसच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड १.११ अंश सेल्सिअस तापमानवाढीसाठी जबाबदार आहे.
- यादीत यूएसए पहिल्या क्रमांकावर. एकूण तापमानवाढीत यूएसएचे याेगदान ०.२८ अंश सेल्सिअस म्हणजे १७.३ टक्के आहे.
- रशियाला मागे टाकून चीन दुसऱ्या क्रमांकावर. याेगदान ०.२० अंश सेल्सिअस. (१२.३ टक्के)
- रशिया तिसऱ्या क्रमांकावर. ०.१० डिग्री सेल्सिअस. प्रमाण ६.१ टक्के.
- ब्राझील चाैथ्या क्रमांकावर, याेगदान ०.०८ डिग्री सेल्सिअस व प्रमाण ४.९ टक्के
- भारत २००५ पूर्वी १० व्या क्रमांकावर हाेता, पण त्यानंतर झेप घेत ५ व्या क्रमांकावर आला.
- इंडोनेशिया, जर्मनी, युनायटेड किंगडम, जपान आणि कॅनडा यांनी प्रत्येकी ०.०३-०.०५ डिग्री सेल्सिअस तापमानवाढीचे योगदान दिले.
- औद्याेगिक क्रांतीनंतर विकसित देश जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरले आहे.
- जीवाश्म इंधन हे सर्वाधिक कारणीभूत
कार्बन संबंधित तापमानवाढीच्या तुलनेत मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडमुळे तापमानवाढीसाठी भारत, चीन आणि ब्राझीलचे योगदान अनुक्रमे ११० टक्के, ५६ टक्के आणि ५५ टक्क्यांनी वाढले आहे.
- संशाेधकांच्या मते मिथेन व नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन अनिश्चित आहे.
- जीवाश्म इंधनातून निर्माण हाेणारे सीओटूचे उत्सर्जन हे सर्वात भयंकर आहे.
- १९९२ पासून, जागतिक जीवाश्म इंधन उत्सर्जनामुळे होणारी अतिरिक्त तापमानवाढ जमीन-वापराच्या बदलामुळे होणाऱ्या अतिरिक्त तापमानवाढीपेक्षा चारपट जास्त आहे.