फेरफार अर्जासाठी आता स्वतंत्र संकलन केंद्र

By Admin | Updated: September 20, 2015 03:15 IST2015-09-20T03:15:47+5:302015-09-20T03:15:47+5:30

शासकीय कामांमधील मध्यस्तांची भूमिका कमी करून भ्रष्टाचार कसा कमी करता येईल, यावर

Independent collection center now to apply for change | फेरफार अर्जासाठी आता स्वतंत्र संकलन केंद्र

फेरफार अर्जासाठी आता स्वतंत्र संकलन केंद्र

सेतू कार्यालयात सुविधा : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची माहिती
नागपूर : शासकीय कामांमधील मध्यस्तांची भूमिका कमी करून भ्रष्टाचार कसा कमी करता येईल, यावर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा विशेष भर आहे. विविध प्रमाणपत्र वितरित करण्याचा कालावधी निश्चित करणे, कामांबाबत काय प्रगती आहे याची माहिती संबंधितांना एसएमएसद्वारे पोहोचविणे आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा ‘फेरफार संबंधी प्रकरणांकडे वळविला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात आता स्वतंत्र फेरफार अर्ज संकलन केंद्र सुरू करण्यात येत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले की, नगर भूमापन अधिकारी क्रमांक १,२, व ३ नागपूर यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर फेरफार अर्ज प्राप्त हेतात. सद्यस्थितीत नगर भूमापन अधिकारी यांचे कार्यालयातील एक खिडकीमध्ये फेरफार अर्ज स्वीकारले जातात. परंतु अर्ज स्वीकृती वेळी त्या अर्जावर किती कालावधीत कार्यवाही केली जाईल, याबाबत माहिती दिली जात नाही. त्यामुळे अर्जदारास नगर भूमापन अधिकारी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यातूनच मध्यस्त वाढीस लागतात आणि भ्रष्टाचाराला वाव मिळतो. शासनाची जनमानसातील प्रतिमा बिघडते. यावर उपाय म्हणून सेतू कार्यालयात स्वतंत्र फेरफार अर्ज संकलन केंद्र सुरू करण्यात येत आहे. यापुढे नगर भूमापन कार्यालयास प्राप्त होणारे फेरफार अर्ज फक्त सेतू कार्यालयातील संकलन केंद्रावरच स्वीकारण्यात येतील. नगर भूमापन कार्यालयात फेरफार अर्ज स्वीकृतीची कार्यवाही यापुढे बंद करण्यात येत आहे. याबाबत जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक पुणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनीही यास मंजुरी दिली आहे. आता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी सदर केंद्रावर नगर भूमापन अधिकारी निहाय फेरफार अर्ज स्वीकृतीसाठी ३ परीक्षण भूमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
केंद्रांवरील कर्मचारी अर्ज स्वीकृती करताना अर्जाची परिपूर्ण छाननी करून अर्ज स्वीकारतील. अर्जासोबत फेरफारसाठी आवश्यक परंतु सादर न केलेल्या कागदपत्रांची लेखी स्वरूपातील माहिती त्याच वेळी संबंधित अर्जदारांना देण्यात येईल. अर्ज स्वीकृतीवेळी अर्जदारास पोहोच देण्यात येईल. सदर पोहोचवर किती दिवसात, कोणत्या तारखेपर्यंत कार्यवाही करण्यात येईल, याची माहिती देण्यात येईल. दिवसभरात स्वीकृत केलेले अर्ज एक खिडकीतील कर्मचारी नगर भूमापन कार्यालयनिहाय छाननी करून संबंधित नगर भूमापन अधिकारी ठरवून दिलेल्या मुदतीत नियमानुसार परिपूर्ण कार्यवाही करतील व अर्जदारास निकाली उत्तराने कळवतील. अर्जदाराचा मोबाईल नंबर अर्जावर घेण्यात येईल. अर्जाबाबतच्या कार्यवाहीची स्थिती अर्जदारास एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. दरमहा किती अर्ज आले, किती अर्जावर कार्यवाही झाली, किती शिल्लक आहेत याबाबतची सांख्यिकीय माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Independent collection center now to apply for change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.