क्राईम ग्राफ वाढतोय...

By Admin | Updated: December 13, 2014 02:51 IST2014-12-13T02:51:21+5:302014-12-13T02:51:21+5:30

उपराजधानीत गेल्या दोन महिन्यात शंभरावर गुन्हे घडले आहेत. खून, बलात्कार, गोळीबार, अवैध दारुविक्री, भूखंड बळकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,

Increasing crime graph ... | क्राईम ग्राफ वाढतोय...

क्राईम ग्राफ वाढतोय...

नागपूर : उपराजधानीत गेल्या दोन महिन्यात शंभरावर गुन्हे घडले आहेत. खून, बलात्कार, गोळीबार, अवैध दारुविक्री, भूखंड बळकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा दावा करीत भाजप आमदारांनी गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांची कोंडी केली. या गुन्ह्यांसाठी संबंधित ठाण्यातील पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही या आमदारांनी केली.
आ. सुधाकर देशमुख यांनी लक्षवेधी सूचना मांडत नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीकडे सरकारचे लक्ष वेधले. देशमुख म्हणाले, हुडकेश्वर येथे तोतया पोलिसांनी एका शिक्षिकेवर बलात्कार केला. कोळशाची तस्करी व खंडणीत गुंतलेल्या एका गुन्हेगाराने आपल्याच एका साथीदारावर धरमपेठेत गोळीबार केला. भांडेप्लॉट झोपडपट्टीमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. याशिवाय दररोज चेनस्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. भूखंड माफिया जागा रिकामी करून घेण्यासाठी नागरिकांना धमकावित आहेत. हे सर्व पोलिसांना माहीत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. गुन्हेगारांना पोलिसांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावर गृहराज्यमंत्री पाटील यांनी गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले असून ‘क्वीक रिस्पॉन्स’साठी शहरातील २३ ठाण्यांना प्रत्येकी एक सुसज्ज वाहन देण्यात आल्याचे सांगितले. वाढत्या गुन्हेगारीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आ. विकास कुंभारे यांनी नाईक तलाव परिसरातील तडीपार असलेला गुंड पिंटु ठवकर हा नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार केली. ठवकर नागरिकांना दिसतो, मात्र पोलिसांना दिसत नाही, पोलीस कारवाई का करीत नाही, असा सवाल त्यांनी केली. यावर राज्यमंत्री पाटील यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. युग चांडक अपहरण व हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणीही कुंभारे यांनी केली. (प्रतिनिधी)
दारुविक्रीची चौकशी होणार
बुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआम होणारी दारुविक्री व मद्यपानाचा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत गाजला. भाजपचे आ. समीर मेघे यांनी ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित या संबंधीच्या वृत्ताचा हवाला देत कारवाईची मागणी केली. यावर संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिले. मेघे म्हणाले, बुटीबोरीच्या चौकात खुलेआम दारुविक्री व पिण्याचा प्रकार सुरू आहे. या चौकापासून ५० मीटर अंतरावर एक मंदिर आहे. ‘लोकमत’ने या संबंधीचे वृत्त त्या ठिकाणच्या छायाचित्रांसह प्रकाशित केले आहे. लोकमतने एवढा मोठा पुरावा सादर केला असतानाही पोलिसांतर्फे द्याप कारवाई करण्यात आलेली नाही, असे सांगत संबंधित दारुविक्री दुकानाचा परवाना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: Increasing crime graph ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.