नागपूरकरांमध्ये वाढतेय विम्याबद्दल जागरूकता
By Admin | Updated: August 8, 2014 01:09 IST2014-08-08T01:09:46+5:302014-08-08T01:09:46+5:30
बदलत्या अर्थव्यवस्थेचे चित्र लक्षात घेता, नागरिकांमध्ये बचत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषत: जीवन विम्याबद्दल उपराजधानीतील नागरिकांमध्ये जागरूकता वाढीस लागली आहे.

नागपूरकरांमध्ये वाढतेय विम्याबद्दल जागरूकता
नागपूर : बदलत्या अर्थव्यवस्थेचे चित्र लक्षात घेता, नागरिकांमध्ये बचत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषत: जीवन विम्याबद्दल उपराजधानीतील नागरिकांमध्ये जागरूकता वाढीस लागली आहे. मागील आर्थिक वर्षात उपराजधानीत पावणेपाच लाखांहून अधिक ‘एलआयसी’ विमा जारी करण्यात आले. संपूर्ण राज्यात ‘एलआयसी’ (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) विम्याच्या संख्येत विभागनिहाय आकडेवारीत नागपूर विभागाचा दुसरा क्रमांक आहे, हे विशेष. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘एलआयसी’कडे निरनिराळ्या मुद्यांसंदर्भात विचारणा केली होती. त्यानुसार समोर आलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या वर्षाच्या कालावधीत नागपूर विभागात ४,७६,४३२ ‘एलआयसी’ विमा जारी करण्यात आले व विमाकृत रक्कम ही ८,६६५ कोटी रुपये इतकी आहे, असे माहितीत नमूद करण्यात आले आहे. राज्यातील १४ विभागांमध्ये उपराजधानीचा दुसरा क्रमांक आहे. ठाणे विभाग प्रथम क्रमांकावर आहे. या काळात १६,६६,२१२ विमा ‘लॅप्स’ झाले, तर ७ लाख ५५ हजार १२ विमा ‘सरेंडर’ करण्यात आले. ९१,५८६ विम्यांसाठी ५३१ कोटी ७९ लाख ९८ हजारांची रक्कम ‘मॅच्युरिटी क्लेम’ म्हणून विमाधारकांना देण्यात आली. (प्रतिनिधी)