थंडीच्या प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ : नितीन बरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:24 IST2019-11-19T23:22:57+5:302019-11-19T23:24:26+5:30

ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

Increase in skin disorder patients due to the effects of cold: Nitin Barde | थंडीच्या प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ : नितीन बरडे

थंडीच्या प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ : नितीन बरडे

ठळक मुद्देकोरडेपणा, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदींचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्वचा कोरडी पडणे, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदी समस्या घेऊन रुग्ण येत आहेत. हिवाळ्यात जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असा सल्ला प्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी दिला.
उन्हाळ्यात त्वचा घामाला नियमितपणे शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढत असल्याचे डॉ. बरडे यांचे म्हणणे आहे.

त्वचा ‘ड्राय’ होणार नाही याची काळजी घ्या
डॉ. बरडे म्हणाले, बदलत्या वातावरणामुळे अनेकवेळा थंडी जाणवत नाही. परंतु थंडीमुळे त्वचा ‘ड्राय’ होते. पर्यायी बरेचसे त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो. म्हणून साबणाचा वापर केल्यानंतर लगेच त्वचेवर मोश्चरायजर लावायला हवे. अंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये. साबणाऐवजी ‘क्लिंजर’ वापरावा. ‘स्क्रब’ क्रिमचा वापर टाळावा. ‘हिटर’मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत अधिक काळजी घ्यावी.

हिवाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करा
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, म्हणून सनस्क्रीन लावले नाही तरी चालते, असा अनेकांचा समज असतो. परंतु हे चुकीचे आहे. उलट हिवाळ्यामध्ये अतिनील किरणे जास्त प्रमाणात सक्रिय असतात. यामुळे सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. बरडे यांनी दिला.

गजकर्ण व सोरायसिस विकाराची विशेष काळजी घ्यावी
ज्यांना आधिपासून गजकर्ण व सोरायसिस आजार आहेत, त्यांना हिवाळ्यात अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी आधीपासूनच नियमित त्वचेला मोश्चरायजर लावावे, सोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. याकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार उफाळून येत असल्याचेही डॉ. बरडे म्हणाले.

‘अ‍ॅलर्जी’कडे दुर्लक्ष नको
हिवाळ्यातील उन्हामुळे ‘अ‍ॅलर्जी’ निर्माण होऊ शकते. यात उन्ह लागणाऱ्या शरीराच्या भागावर लाल पुरळ येऊन खाज सुटते, अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यायला हवे. शिवाय, उलन किंवा इतर उबदार कपडे वापरताना आत सुतीचे कपडे घालणे आवश्यक असते.

ओठांची विशेष काळजी घ्या
हिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवणे आवश्यक आहे. ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. यामुळे वारंवार ओठांना जीभ लावू नये.
ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फूटण्यापूर्वी व्हॅसलिन किंवा ‘लिप बाम’चा वापर नियमित करायला हवा, असेही डॉ. बरडे म्हणाले.

भरपूर पाणी प्या
हिवाळ्यात आहाराकडेही योग्य लक्ष द्यायला हवे. आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळाचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करायला हवा असे सांगत डॉ. बरडे म्हणाले, थंडीमुळे अनेक जण पाणी कमी पितात. याचा परिणाम आरोग्यावर होता. यामुळे ऋतु कुठलाही असो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवे.

Web Title: Increase in skin disorder patients due to the effects of cold: Nitin Barde