लॉकडाऊनमुळे अ‍ॅडव्हान्स कॅन्सरच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 07:00 AM2020-11-28T07:00:00+5:302020-11-28T07:00:02+5:30

Nagpur News cancer लॉकडाऊनच्या काळात उपचार घेऊ न शकणारे रुग्ण गंभीर होऊन येत आहे. विशेषत: कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात असलेले रुग्ण आता तिसऱ्या ते चवथ्या टप्प्यात गेले आहेत. त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.

Increase in patients with advanced cancer due to lockdown | लॉकडाऊनमुळे अ‍ॅडव्हान्स कॅन्सरच्या रुग्णांत वाढ

लॉकडाऊनमुळे अ‍ॅडव्हान्स कॅन्सरच्या रुग्णांत वाढ

Next
ठळक मुद्देमेडिकलच्या कर्करोग विभागात ४० टक्क्यांवर रुग्णस्तन, तोंडाच्या व फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात उपचार घेऊ न शकणारे रुग्ण गंभीर होऊन येत आहे. विशेषत: कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात असलेले रुग्ण आता तिसऱ्या ते चवथ्या टप्प्यात गेले आहेत. त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. मेडिकलमधील कर्करोग विभागाच्या रोजच्या ओपीडीमध्ये ४० टक्के रुग्ण हे ‘अ‍ॅडव्हान्स’ स्टेजमधील असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यात स्तन, तोंडाच्या व फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

कोरोनाचे सावट गंभीर होताच मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. परिणामी, आंतरजिल्हा प्रवासावर बंदी आली. सार्वजनिक व खासगी वाहतूकही बंद होती. यातून रुग्णांना सूट देण्यात आली होती. परंतु अनेकांनी प्रवास टाळला. जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाले तरी कोरोनाच्या भीतीने रुग्ण घरीच होते. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागताच रुग्ण घराबाहेर पडू लागले. परंतु या सात ते आठ महिन्याच्या काळात अनेक कर्करुग्णांचा आजार पुढच्या पायरीपर्यंत गेल्याचे दिसून आले. मेडिकलच्या कर्करोग विभागात पहिल्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झालेले रुग्ण आता दुसऱ्या ते चवथ्या टप्प्यापर्यंत पसरलेला कॅन्सर घेऊन येत आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी आहे. डॉक्टरांनुसार, बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येत असलेल्या रुग्णांमध्ये ४० टक्के रुग्ण हे अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये येत आहेत. त्यांच्यावरील उपचाराची गुंतागुंत वाढली आहे.

फाटलेले गाल, जिभेवर वाढलेली जखम यांच्या रुग्णांत वाढ

मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवान यांनी सांगितले, लॉकडाऊनपूर्वी ज्या रुग्णांचे पहिल्या टप्प्यात निदान करून त्यांना उपचाराखाली आणले होते ते आता सहा ते आठ महिन्यांतर उपचारासाठी येत आहेत. परिणामी, त्यांच्यामध्ये कॅन्सर वाढला आहे. विशेषत: ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ कॅन्सरच्या रुग्णांत फाटलेले गाल, जीभेवर मोठा झालेला फोड, तर वाढलेली गाठ घेऊन ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण येत आहेत. या रुग्णांना भरती करून पुढील उपचार केले जात आहेत.

ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील रुग्णांत अ‍ॅडव्हान्स कॅन्सरचे प्रमाण अधिक -डॉ. मानधनिया

कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, सहा ते सात महिन्यातील विना उपचारामुळे अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सरचे रुग्ण दिसून येत आहेत. यात ग्रामीण व जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या मोठी आहे. या तुलनेत शहरातील रुग्णांनी काळजी घेत लॉकडाऊनच्या काळातही उपचार घेतला आहे.

पहिल्या व दुसऱ्या पायरीच्या कर्करोगावर वेळीच केमोथेरपी, रेडिओथेरपी व शस्त्रक्रिया केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात. परंतु अनेक रुग्ण तिसऱ्या व चवथ्या टप्प्यात गेल्याने यशस्वी उपचाराचा दर कमी होतो. धक्कादायक म्हणजे, सध्या अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

-डॉ. अशोक दिवान

प्रमुख, कर्करोग विभाग, मेडिकल

 

Web Title: Increase in patients with advanced cancer due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.