सिकलसेलच्या रूग्णसंख्येत वाढ
By Admin | Updated: May 12, 2014 00:33 IST2014-05-12T00:33:07+5:302014-05-12T00:33:07+5:30
अमरावती अमरावती विभागात जीवघेण्या सिकलसेल या आनुवंशिक आजाराने ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ झाली आहे.

सिकलसेलच्या रूग्णसंख्येत वाढ
सुरेश सवळे - अमरावती अमरावती विभागात जीवघेण्या सिकलसेल या आनुवंशिक आजाराने ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ झाली आहे. मार्च २०१४ अखेर झालेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. या माहितीनुसार अमरावती विभागात १४ हजार ४४४ तर जिल्ह्यात ४ हजार ६८२ रूग्णांना सिकलसेलची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यात सर्वाधिक रूग्ण यवतमाळ जिल्ह्यात असून वाशिममध्ये सर्वात कमी रूग्ण आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सिकलसेलच्या आजारावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. वर्षाकाठी प्रत्येक जिल्ह्याला या रूग्णांच्या शोध मोहिमेचे उद्दीष्ट देण्यात येते. त्यानुसार अमरावती ३ लक्ष, अकोला २ लाख, बुलडाणा २ लाख ७५ हजार, वाशीम २ लाख आणि यवतमाळ जिल्ह्याला ३ लक्ष रूग्ण तपासण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी अमरावती आरोग्य विभागात १ लक्ष ४४ हजार, अकोला १ लक्ष ३० हजार ७४, बुलडाण्यात २७७७, वाशीम जिल्ह्यात ४९२ आणि यवतमाळ जिल्ह्यात ४८५९ अशा एकूण १४ हजार ४४४ जणांना सिकलसेलची लागण झाल्याचे आढळून आले. सिकलसेल हा आनुवंशिक रक्तदोषामुळे उदभवणारा आजार असून रक्तातील हिमोग्लोबीन कमी करतो. लाल रंगाच्या श्वेतपेशींमध्ये व्हॅलीन अमिनो अॅसिड येते. तेव्हा गोलाकार रक्तपेशींचा आकार बदलून त्या वक्राकार किंवा विळ्यासारख्या दिसायला लागतात. विळ्याला इंग्रजी भाषेत ‘सिकल’ असे संबोधतात. तर पेशींना ‘सेल’ असे संबोधतात. यावरून या आजाराचे नाव ‘सिकलसेल’ प्रचलित झाले आहे. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे या आजाराच्या रूग्णांना वारंवार रक्तपुरवठा करावा लागतो. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालये, सामान्य रूग्णालये, जिल्हा सामान्य रूग्णालये आदी केंद्रांवर या रूग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. याकरिता अमरावती नऊ, अकोला पाच, बुलडाणा पाच व यवतमाळ जिल्ह्यात १४ तपासणी यंत्र वापरण्यात आले. या तपासणीत जिल्ह्यातील सिकलसेल रूग्णांची आकडेवारी समोर आली आहे. वर्षाकाठी वाढणार्या आकडेवारीने सिकलसेल प्रतिबंधक यंत्रणेचे पितळ उघडे पडल्याचे दिसते.