वृद्धांशी संवाद वाढवा
By Admin | Updated: November 9, 2014 00:48 IST2014-11-09T00:48:45+5:302014-11-09T00:48:45+5:30
प्रौढांचे मानसिक आरोग्य झपाट्याने बिघडत असून, एकूण प्रौढांपैकी ४५ टक्के जणांना स्मृतिभ्रंश आणि नैराश्याने ग्रासले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे कुटुंबात वृद्धांशी कमी झालेला संवाद हा आहे.

वृद्धांशी संवाद वाढवा
जेरियाट्रिक्स सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ चॅप्टर
नागपूर : प्रौढांचे मानसिक आरोग्य झपाट्याने बिघडत असून, एकूण प्रौढांपैकी ४५ टक्के जणांना स्मृतिभ्रंश आणि नैराश्याने ग्रासले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे कुटुंबात वृद्धांशी कमी झालेला संवाद हा आहे. ६० ते ८० वयोगटातील प्रौढांमध्ये चिडचिड, संताप आणि एकटेपणा आदी समस्या वाढल्या असल्याने, कुटुंबातील सदस्यांना घरातील ज्येष्ठांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सांभाळण्याचीही जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
जेरियाट्रिक्स सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ चॅप्टरच्यावतीने आजपासून दोन दिवस ‘जसीकॉन-२०१४’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठांना सतावणारे आजार, घ्यावयाची काळजी, संसर्गजन्य आजाराचे महत्त्व, मनाची तयारी, एकटेपणाची समस्या, हाडांचे आजार, यासह वृद्धांना औषधे कशी द्यावीत या बाबींवर विचारमंथन करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन डॉ. मणिंदर आहुजा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे जेरियाट्रिक सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश गुलाटी, सचिव डॉ. ओ.पी. शर्मा, इन्फ्लूएन्झा फाऊंडेशन आॅफ इंडियाचे डॉ. ए.के. प्रसाद, जेरियाट्रिक सोसायटी आॅफ विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. भाऊ राजूरकर, सचिव डॉ. संजय बजाज, डॉ. एस.डब्ल्यू. कुलकणी, डॉ. ओ.पी. शर्मा, डॉ. राजेंद्र झारिया आदी उपस्थित होते.
‘जेरियाट्रिक्स’ विषय आवश्यक
डॉ. आहुजा म्हणाल्या, वैद्यकीय अभ्यासक्रमात बालरोगापासून शरीराच्या विविध विषयाचा अभ्यास अंतर्भूत असतो. यात ‘जेरियाट्रिक्स’ (वयस्क लोकांना होणाऱ्या रोगांचा अभ्यास) हा विषय असणे आवश्यक झाले आहे. या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. त्यामुळे डॉक्टरांनी एकत्र येऊन जेरियाट्रिक्स सोसायटीला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वयस्कांसाठी स्वतंत्र वॉर्ड हवा
डॉ. गुलाटी म्हणाले, वयस्कांचे आजार वेगळे असतात. त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये वयस्कांसाठी स्वतंत्र वॉर्ड असायला हवे.
घोरत असला तर, निदान करा
घोरणे हा आजार आहे, असे अनेक लोक मानत नाहीत. वयस्कर स्त्री-पुरु षांपैकी २० ते २५ टक्के लोक झोपेत घोरतात. वयाप्रमाणे घोरणाऱ्या स्त्री-पुरु षांची संख्या वाढतच जाते. घोरण्यामुळे शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बऱ्याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात. घोरण्याबरोबर अनेक आजारांशी नाते आढळून येते. घोरणाऱ्या व्यक्तींना अतिरक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा आघात झाल्याने पक्षाघात होऊ शकतो. यामुळे याचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे, अशी माहिती डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.