चुकीच्या कोच इंडिकेटरमुळे प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:35+5:302021-02-13T04:10:35+5:30
नागपूर : शुक्रवारी दुपारी रेल्वेगाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना धावपळ करावी लागली. कोच इंडिकेटरमध्ये दाखविण्यात येणारी कोचची जागा गाडी ...

चुकीच्या कोच इंडिकेटरमुळे प्रवाशांची गैरसोय
नागपूर : शुक्रवारी दुपारी रेल्वेगाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना धावपळ करावी लागली. कोच इंडिकेटरमध्ये दाखविण्यात येणारी कोचची जागा गाडी आल्यानंतर दुसरीकडेच निघाल्यामुळे प्रवाशांना आपले साहित्य घेऊन ऐन वेळी आपल्या कोचपर्यंत पोहोचावे लागले. सुदैवाने या धावपळीत प्रवाशांना दुखापत झाली नाही. याबाबत दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांची स्थिती समजण्यासाठी प्लॅटफार्मवर कोच इंडिकेटर लावण्यात आले आहेत. या कोच इंडिकेटरमध्ये गाडीच्या एसी १, एसी २, स्लीपर व जनरल कोचची स्थिती दाखविण्यात येते. त्यामुळे गाडी येण्याच्या दहा मिनिटांपूर्वी प्रवासी आपला कोच येणार असलेल्या जागी उभे राहतात. यामुळे पाच मिनिटे थांबणाऱ्या गाड्यात आपले साहित्य घेऊन चढणाऱ्या प्रवाशांना त्रास होत नाही, परंतु रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टणम-नवी दिल्ली ही गाडी प्लॅटफार्मवर आल्यानंतर आधी दाखविण्यात येत असलेली कोचची जागा नंतर बदलण्यात आली. यामुळे मुंबई एण्डकडे दाखविण्यात आलेला कोच गाडी प्लॅटफार्मवर उभी राहिल्यानंतर इटारसी एण्डकडे लागला. अशा स्थितीत प्रवाशांना आपले साहित्य घेऊन एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मनस्ताप सहन करावा लागला. गाडीचा थांबा १० मिनिटांपेक्षा कमी असल्यामुळे प्रवाशांना त्रास झाला. ज्येष्ठ प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली. अशा प्रकारच्या घटना नागपूर रेल्वे स्थानकावर यापूर्वीही घडल्या आहेत.
...............
दोषींवर कारवाई करू
‘ऐन वेळी कोचची जागा बदलल्याची घटना घडली आहे, परंतु त्वरित ही चूक दुरुस्त करण्यात आली. यात दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.’
- एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
...........