हवाला आणि डब्बा व्यावसायिकांवर आयकर धाडी; कारवाईत मुंबईचे अधिकारी
By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 10, 2023 17:19 IST2023-05-10T17:18:29+5:302023-05-10T17:19:02+5:30
Nagpur News कर चुकवेगिरी करणारे आणि हवाला व डब्बा व्यवसायात लिप्त असलेल्या नागपुरातील नऊ व्यावसायिकांचे निवासस्थान आणि कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या.

हवाला आणि डब्बा व्यावसायिकांवर आयकर धाडी; कारवाईत मुंबईचे अधिकारी
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : कर चुकवेगिरी करणारे आणि हवाला व डब्बा व्यवसायात लिप्त असलेल्या नागपुरातील नऊ व्यावसायिकांचे निवासस्थान आणि कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी एकाचवेळी धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे नागपुरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून आलेल्या जवळपास १५० हून अधिक आयकर अधिकाऱ्यांनीच धाडी टाकल्या आहेत. नागपूर आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी नाहीत. कारवाईत पोलिसांसह सीआरपीएफ जवानांची मदत घेण्यात आली आहे.
डब्बा व्यावसायिकांमध्ये रवी अग्रवाल आणि हवाला व्यावसायिक शैलेश लखोटिया, पारस जैन, लाला जैन, करण थावरानी, प्यारे खान, गोपी मालू, हेमंत तन्ना, इजराईल सेठ आणि सीए रवी वानखेडे यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या. प्यारे खान हे ताजाबाद ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. रवी अग्रवाल यांचा व्यवसाय नागपूरसह मुंबईतही पसरला आहे. त्यांचे ‘छतरपूर फार्म’ नावाजलेला आहे. त्यांची एल-७ कंपनी डब्बा व्यवसायात २००७ ते २०१५ पर्यंत कार्यरत होती. वर्ष २०१५ मध्ये सर्वप्रथम डब्बा व्यवसाय घोटाळ्यात त्यांचे नाव पुढे आले होते. त्यावेळी पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. ईडी रवी अग्रवाल यांची चौकशी करीत असल्याची माहिती आहे. इजराईल सेठ यांचा जरीपटका येथे जिंजर मॉल चर्चेत आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्यारे खान यांचे नाव कोरोना काळात ऑक्सिजन सिलिंडर पुरवठ्यावरून चर्चेत आले होते. ते हवाला व्यवसायात गुंतल्याची माहिती आहे.
कारवाई आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. शहरात सक्रिय सडक्या सुपारीचे व्यापारी, मिरची व्यापारी, काही बिल्डरांवर आयकर विभागाची कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.