मेडिट्रीना हॉस्पिटलवर आयकर विभागाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:05 IST2018-09-17T22:04:40+5:302018-09-17T22:05:11+5:30
आयकर विभागाच्या तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रामदासपेठ सेंट्रल बाजार मार्गावरील प्रसिद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिट्रीनाच्या लेखा पुस्तकांची तपासणी केली. या तपासणीसाठी आयकर विभागाने १० अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. सोमवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता सुरू झालेली ही तपासणी वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.

मेडिट्रीना हॉस्पिटलवर आयकर विभागाची नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयकर विभागाच्या तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रामदासपेठ सेंट्रल बाजार मार्गावरील प्रसिद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिट्रीनाच्या लेखा पुस्तकांची तपासणी केली. या तपासणीसाठी आयकर विभागाने १० अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. सोमवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता सुरू झालेली ही तपासणी वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.
आयकर विभागाशी संबंधित सूत्रानुसार, मेडिट्रीना हॉस्पिटलचा संचालकाने मोठ्या संख्येत काळा पैशाला वैध केल्याचा आयकर अधिकाऱ्यांना संशय आहे. मेडिट्रीनाचे संचालक व्यवसायाने न्यूरोसर्जन आहेत. सूत्रांचा आरोप आहे की, त्यांनी या हॉस्पिटलच्या स्थापनेसाठी आपल्या सुमारे २४ वेगवेगळ्या नातेवाईक आणि मित्रांकडून लाखो रुपयांची रोख रक्कम जमा केली होती.
सांगण्यात येते की, यातील बहुसंख्य लोक हे चंद्रपूर आणि यवतमाळ येथील आहेत. त्यांनी मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये आपले भागभांडवल खरेदीसाठी गेल्या ८-१० वर्षांपासून लाखो रुपये रोख दिले आहेत. हे प्रकरण सुमारे सहा महिन्यांपूर्वी समोर आले, जेव्हा आयकर अधिकाऱ्यांनी यवतमाळमध्ये यातीलच एका भागीदाराच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीच्या दरम्यान या भागीदाराचे नागपूरच्या मेडिट्रीना हॉस्पिटलशी आर्थिक संबंधाबाबत संशयित खुलासा झाला होता. सूत्राने सांगितले की, तेव्हापासूनच या हॉस्पिटलवर आयकर विभागाची नजर होती.
या वृत्ताला घेऊन हॉस्पिटलचे संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईल बंद होता.