बाल कर्करोग ९५ टक्के बरा होत असताना मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:10 IST2021-08-22T04:10:04+5:302021-08-22T04:10:04+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारण ९५ टक्के बरा होणारा आहे. परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत ...

बाल कर्करोग ९५ टक्के बरा होत असताना मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवर
सुमेध वाघमारे
नागपूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारण ९५ टक्के बरा होणारा आहे. परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेल्या चिमुकल्यांसाठी मेडिकलमधील सोयी अपुऱ्या पडतात. मेडिकल प्रशासनाने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु तरीही बाल कर्करोगात मृत्यूचे प्रमाण सुमारे ४० ते ५० टक्के आहे.
वयस्क लोकांच्या तुलनेत बालपणात आढळणारे कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या केवळ तीन ते चार टक्के आहे. बालपणातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात १६.२३ टक्के एवढे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकिरणोपचार व कर्करोगशास्त्र विभागात बाल कर्करोग रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात विविध कॅन्सरच्या ३५० चिमुकल्यांची नोंद झाली होती. यातील जवळपास ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
- रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही
बाल कर्करोगाच्या रुग्णांसाठी मेडिकलमध्ये स्वतंत्र वॉर्ड नाही. या रुग्णांना बालरोग विभागाच्या वॉर्डात ठेवले जाते. यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता अधिक असते. दरम्यानच्या काळात या रोगाच्या विशेष उपचारासाठी बालरोग विभागात १० खाटांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे.
-बाल कर्करोग रुग्णांना भरावे लागते शुल्क
कर्करोगाच्या रुग्णांना किमोथेरपी व रेडिओथेरपीच्या दरम्यान दर आठवड्यात रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात. उपचारापेक्षा तपासण्यांचा खर्च जास्त असतो. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत रक्ताच्या तपासण्या नि:शुल्क केल्या असतानाही रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या काही रुग्णांच्या तक्रारी आहेत.
-‘कॅनकिड्स’संस्थेशी सामंजस्य करार
जागरुकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी, अवाक्याबाहेरचा खर्च व अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. मात्र याचा फायदा किती रुग्णांना झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
-बाल रुग्णांचा कर्करोगावर उपचार करणे हे सरकारचे कर्तव्य
लहान मुलांचा कर्करोग हा ९५ ते ९८ टक्क्यांपर्यंत बरा होणारा आहे. परंतु नागपुरातील शासकीय रुग्णालयात ती सोय नाही. मुंबई, दिल्लीमध्ये बाल रुग्णांसाठी कर्करोगाचे स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे. मात्र अनेक रुग्णांना तिथे जाणे, राहणे व उपचार घेणे अशक्य आहे. विदर्भाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या मेडिकलमध्येही ही सोय असायलाच हवी. बालकांचा कर्करोग बरा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बाल कर्करोगाच्या मृत्यूमागे उशिरा होत असलेले निदान, मेडिकलमध्ये ऑकोलॉजिस्ट तज्ज्ञाचा अभाव, महागडा औषधोपचार, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव ही कारणे आहेत.
-माजी आ. डॉ. मिलिंद माने, बालरोग तज्ज्ञ
बालवयातील कॅन्सर व त्यांचे प्रमाण
रक्ताचा कॅन्सर-३९.७ टक्के
लिम्फोमा- १२ टक्के
मेंदूचा कॅन्सर - ११.४ टक्के
हाडाचा कॅन्सर- ७.६ टक्के
मांसपेशीचा कॅन्सर- ४.४ टक्के
गुर्दा किडनी- ३.५ टक्के
डोळ्याचा कॅन्सर - २.५ टक्के