मोरेश्वर मानापुरे
नागपूर : मिहान-सेझमधील पतंजलीच्या आशियातील सर्वात मोठ्या फूड आणि हर्बल पार्कमधील ‘ज्यूस युनिट’चे उद्घाटन ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमात मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पतंजली समूहाचे प्रमुख बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण उपस्थित राहतील. या प्रकल्पाचे भूमिपूजन सन २०१६ मध्ये करण्यात आले होते, हे विशेष.
प्रकल्पात लागणारा बहुतांश कच्चा माल विदर्भातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ स्वत: बाबा रामदेव यांनी जारी केला आहे. कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी मी ८ तारखेला नागपूरला पोहोचणार असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.एक हजारांहून अधिक कोटींची गुंतवणूक पतंजली समूहाने पतंजली फूड अँड हर्बल पार्कसाठी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि सेझबाहेर अर्थात मिहानमध्ये १०० एकराहून अधिक जमीन खरेदी केली आहे. समूहाची मिहानमध्ये ४१८ एकर जमीन आहे. कंपनी या प्रकल्पावर एक हजाराहून अधिक कोटींची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पात टप्प्याटप्प्याने नवीन उत्पादने जोडली जातील. कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा प्रकल्प असेल जिथे विविध उत्पादने तयार केली जातील. प्रकल्पामध्ये यंत्रसामग्री आधीच बसविण्यात आली आहे. काहींचे उत्पादन सुरू झाले आहे. आता प्रतीक्षा संपली असून ९ मार्च रोजी अधिकृतपणे उद्घाटन होणार आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची खरेदी
रामदेव बाबा म्हणाले, प्रकल्पाला लागणारा कच्चा माल सर्वात महत्त्वाचा असतो. बहुतांश माल विदर्भातील शेतकरी आणि लगतच्या भागातून खरेदी केला जाईल. प्रकल्पामध्ये ज्यूससोबत इतरही अन्नपदार्थही तयार केले जातील. संत्र्याचा रस तयार करण्यासाठी दररोज ८०० ते ९०० टन संत्रा लागेल. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.