नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी मेडिकलमध्ये कोविड रुग्णांसाठी आणखी १०० बेड तयार करण्यात आल्याची माहिती शनिवारी बैठकीत दिली असताना त्याच रात्री कोरोनाचा वॉर्डात बेड रिकामे नसल्याने कॅज्युअल्टीमध्ये एका खाटेवर दोन रुग्णांना संपूर्ण रात्र काढावी लागली. एकीकडे प्रशासन कागदोपत्री घोडे नाचवून स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना प्रत्यक्षात मात्र चित्र भयावह असल्याचे यावरून दिसून येते.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. आता घराघरात रुग्ण दिसून येत आहेत. त्यांच्या उपचाराकडे महानगरपालिकेचे विशेष लक्ष नसल्याने होम आयसोलेशनमधील रुग्ण गंभीर होऊन मेयो, मेडिकलमध्ये उपचारासाठी गर्दी करीत आहेत. परंतु येथेही बेड मिळत नसल्याने ‘मरावे की जगावे’ अशा अडचणीत रुग्ण सापडला आहे. विशेष म्हणजे, पहिली लाट आली असताना १००० जम्बो हॉस्पिटलची घोषणा खुद्द पालकमंत्री राऊत यांनी केली होती. परंतु त्यानंतर कोणीच याला गंभीरतेने घेतले नाही. सप्टेंबर २०२० मध्ये मेडिकलमध्ये ४०० खाटा वाढविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मेडिकल प्रशासनाने तातडीने १० वॉर्ड रिकामे करून दिले. सूत्रानुसार, दरम्यानच्या काळात रुग्णसंख्या कमी होताच या वॉर्डात ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्यापासून इतर सोयी उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यास जिल्हा प्रशासनाने हात आखडता घेतला. जेव्हा दुसरी लाट अधिक तीव्र झाली तेव्हा कुठे निधी मिळाला. परंतु अद्यापही याचे काम सुरू असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. तूर्तास ४०० मधील १०० बेड रुग्णसेवेत सुरू झाल्याचे सांगितले जाते.
-कॅज्युअल्टीच फुल्ल तर, नव्या रुग्णांना ठेवणार कोठे?
मेडिकलमधील कोविड वॉर्डातील खाटा फुल्ल झाल्याने मेडिसीन विभागाच्या कॅज्युअल्टीमध्ये शनिवारी रात्री सर्वच खाटांवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले होते. यातील बहुसंख्य रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली होती. कॅज्युअल्टीमध्ये नव्याने येणाऱ्या रुग्णाला तपासणीपासून तर उपचारापर्यंत खाटच मिळाली नसल्याने अनेकांचे हाल झाल्याच्या तक्रारी आहेत.
-स्वतंत्र कोविड ओपीडीच नाही
मेयोमध्ये स्वतंत्र कोविड ओपीडी आहे. परंतु मेडिकलमध्ये ही सोयच नाही. मेडिसीनच्या कॅज्युअल्टीमध्ये कोविड, संशयित कोविड व नॉन-कोविड रुग्ण एकत्र येत असल्याने प्रादुर्भावाचे केंद्र ठरत आहे. निवासी डॉक्टरांनाही याचा फटका बसत आहे.