जीवन-मरणाच्या 'त्या' घनघोर झुंजीत बिबट हरला, सायाळ जिंकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 21:12 IST2022-02-28T21:11:26+5:302022-02-28T21:12:01+5:30
Nagpur News वन्यजीवांमध्ये होणारी झुंज ही नेहमीच शर्थीची राहिली आहे. सोमवारी सकाळी सोनवाढोणा-बोरगाव मार्गावर अशाच एका झुंजीत बिबटाने सायाळापुढे शरणागती पत्करली.

जीवन-मरणाच्या 'त्या' घनघोर झुंजीत बिबट हरला, सायाळ जिंकला
यवतमाळ : वन्यजीवांमध्ये झालेल्या झुंजीत बिबट हरला, तर सायाळ हा प्राणी जिंकला. हा प्रकार सोमवारी सकाळी सोनवाढोणा-बोरगाव मार्गावर उघडकीस आला. बिबटच्या सर्वांगावर सायाळ प्राण्याने काट्याने टोचल्याचे दिसून आले. गळ्यालाही मोठमोठ्या जखमा आढळून आल्या.
मालखेड बिटामध्ये रस्त्याच्या कडेला बिबट मृत्युमुखी पडून असल्याचे एका वाहनचालकाला दिसले. या प्रकाराची माहिती वन विभागाला देण्यात आली. नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोव्हळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या पाहणीत सायाळच्या हल्ल्यातच बिबट मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले.
यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव दाभळे, उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण, संतोष ठाकरे, अशोक कदम, विनोद आठवले आदी घटनास्थळी धडकले. पंचनामा करून मृत बिबट शवचिकित्सेसाठी नेर येथे रवाना करण्यात आला. यानंतर वन विभागाच्या परिसरात बिबटाला अग्नी देण्यात आला.
संपूर्ण प्रक्रिया मालखेड बीटचे क्षेत्र सहायक एस.वाय. वाघमारे, सोनखास उपवन परिक्षेत्राचे व्ही.बी. उमाटे, वनरक्षक एस.बी. जुवार, वैशाली खडके, ठाकरे, अशोक कदम, गोविंद राठोड, हरिचंद्र राठोड, सुखदेव राठोड, राजू शेलोटकर, दिनेश चव्हाण आदींनी पार पाडली.