‘झुरकेबाज’ नगरसेवक, नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेतच ओढली सिगारेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 14:00 IST2022-01-30T13:51:58+5:302022-01-30T14:00:22+5:30
नागपूर मनपाच्या ऑनलाईन सभेदरम्यान एक नगरसेवक सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे.

‘झुरकेबाज’ नगरसेवक, नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेतच ओढली सिगारेट
नागपूर : नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन बैठकीदरम्यान एक नगरसेवक अगदी बिंधास्तपणे सिगारेटचे झुरके मारत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बैठकीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येताना पहायला मिळत आहेत.
नागपूर महानगरपालिकेची एक ऑनलाईन बैठक सुरू होती. या बैठकीत काही कंपन्यांचे काम समाधानकारक नसल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. या विषयावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक रमेश पुणेकर हे चक्क सिगारेट ओढत असल्याचे दिसून आले.
या बैठकीत महापालिकेचे महापौर, आयुक्तांसह इतर नगरसेवकदेखील उपस्थित होते. मात्र, या सर्वांच्या उपस्थितीत नगरसेवक पुणेकर अगदी बेधडकपणे सिगारेटचे झुरके घेताना दिसले. दरम्यान याच कालावधीत कुणीतरी व्हिडीओ रेकॉर्डिंग केली. ही क्लिप व्हायरल होताच सोशल मीडियावरून संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. सभा सुरू असताना असे कृत्य करणाऱ्या नगरसेवकाला नागरिकांच्या आणि शहरातील प्रश्नांबाबत गांभीर्य नाहीये का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.