नागपुरात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Updated: October 27, 2023 17:48 IST2023-10-27T17:48:15+5:302023-10-27T17:48:30+5:30
आपल्या मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर आहे.

नागपुरात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन
नागपूर: आपल्या मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर आहे. नागपुरातील संविधान चौकामध्ये त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी आशांनी जेलभरो आंदोलन केले. जेव्हापर्यंत मागण्या मान्य होणार नाही तेव्हापर्यंत आंदोलन सतत चालू राहणार असा इशारा संघटनेचे नेते राजेंद्र साठे यांनी दिला. आंदोलनामुळे शासनातर्फे परिपत्रक काढून आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना कार्यमुक्त करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
परंतु सरकारच्या धमकीला न घाबरता जेव्हापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा होत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दिवाळी बोनस ५ हजार रुपये देण्यात यावा, २६ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, निवृत्तीनंतर ५ लाख रुपये देण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर १० हजार रुपये महिना पेन्शन देण्यात यावी, गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना बरोबर समायोजन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू आहे. व्हेरायटी चौकात झालेल्या आंदोलनात प्रिती मेश्राम, रंजना पौनिकर, लक्ष्मी कोत्तेवार यांचे नेतृत्वात रस्ता रोखून जेलभरो आंदोलन करण्यात आले.