जाहीर कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांतील वाद चिघळला; चौकशीचा अहवाल थेट मंत्रालयाकडे जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 22:06 IST2025-10-25T22:05:53+5:302025-10-25T22:06:13+5:30
किस्सा खुर्चीचा, शासकीय यंत्रणात उलटसुलट चर्चा

जाहीर कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांतील वाद चिघळला; चौकशीचा अहवाल थेट मंत्रालयाकडे जाणार
नरेश डोंगरे
नागपूर : टपाल (डाक) खात्यातील दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी जाहीर कार्यक्रमात रंगलेला वाद आता चिघळला आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल संचार मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे शासकीय यंत्रणात उलटसुलट चर्चा सुरू असून, या वादाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात डाक विभागाच्या वतीने शुक्रवारी १७ व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर या कार्यक्रमात पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे आणि पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी या दोघींमध्ये वाद झाला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. लोकमतने या संबंधाने वृत्त प्रकाशित करताच सर्वत्र चर्चेला उधाण आले. नवी मुंबईच्या पीएमजी सुचिता जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडेच विदर्भ विभागाचा प्रभार आहे. त्यांनाच शुक्रवारच्या कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
दुसरीकडे, शोभा मधाळे यांची ८ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर कर्नाटकातील धारवाड येथे बदली झाल्याचे आदेश आले होते. त्यांनी या आदेशाला न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्यानंतर शुक्रवारच्या कार्यक्रमात त्या विदर्भाच्या पीएमजी म्हणून वावरत होत्या. त्यानंतर मंचावरच या दोन महिला अधिकाऱ्यांमधील वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला. लोकमतने शनिवारी हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर टपाल खात्याने त्याची गंभीर दखल घेतली. चाैकशी करून त्याचा अहवाल मंत्रालयात पाठविण्याचीही तयारी चालवली.
मंत्रालयातूनच कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, व्हिडिओत दोषी जाणावऱ्या अधिकारी संयुक्त सचिव स्तराच्या अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मंत्रालय पातळीवरूनच होऊ शकते.