गडकरी-फडणवीसांची साद, मराठी मतदारांचा भाजपसोबत ‘हात’!

By योगेश पांडे | Published: December 4, 2023 05:17 AM2023-12-04T05:17:54+5:302023-12-04T05:18:16+5:30

मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये नागपुरातील नेत्यांची ‘कमाल', मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांत निवडणुकांच्या अगोदरपासूनच फडणवीस सक्रिय होते. मध्य प्रदेशातील जनआशीर्वाद यात्रेत ते सहभागी झाले होते

In Chhattisgarh, Madhya Pradesh, BJP leaders from Nagpur Nitin Gadkari, Devendra Fadnavis addressed Marathi voters. | गडकरी-फडणवीसांची साद, मराठी मतदारांचा भाजपसोबत ‘हात’!

गडकरी-फडणवीसांची साद, मराठी मतदारांचा भाजपसोबत ‘हात’!

नागपूर : मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील निकालांमुळे भले भले राजकीय धुरीणदेखील चकित झाले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक मतदारदेखील आहेत. हीच बाब लक्षात ठेवून भाजपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचाराची मोठी जबाबदारी दिली होती. या नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून मराठी जनतेला साद घातली होती नेत्यांच्या आवाहनावर मराठी मतदारांनी भाजपला कौल दिला व बहुतांश मराठीबहुल भागात भाजपला चांगले यश मिळाले असल्याचे चित्र आहे.

मध्यप्रदेशातील इंदूर व ग्वाल्हेरमधील प्रत्येकी चार मतदारसंघ, बैतुल, आमला, बैतुल, भोपाळ, जबलपूर, उज्जैन, रिवा, सिवनी, मुलताई, पांढुर्णा, ग्वाल्हेर, सौंसर येथे तर छत्तीसगडमधील दुर्ग, रायपूर, राजनांदगाव, भिलाई परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक राहतात. यातील अनेक ठिकाणी मराठी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात उतरले होते. तसेच गडकरी, फडणवीस, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचे मागील सहा महिन्यांपासूनच दौरे सुरू झाले होते.

निवडणुकांच्या अगोदरपासूनच सक्रिय होते फडणवीस
मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांत निवडणुकांच्या अगोदरपासूनच फडणवीस सक्रिय होते. मध्य प्रदेशातील जनआशीर्वाद यात्रेत ते सहभागी झाले होते व इंदूर, धार, महू, बेटमा येथे त्यांनी स्वत: बैठका घेऊन मार्गदर्शन केले होते. याशिवाय इंदूर, बुरहानपूर, पांढुर्णा, सौंसर, येथे सभादेखील केल्या. प्रचारादरम्यान फडणवीस यांनी विकासाच्या मुद्द्यांसोबत सनातन वाद, रामावरील काँग्रेसची भूमिका यावर प्रहार करत भावनिक मुद्दे उपस्थित केले होते. मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागात पाणी समस्या आहे. फडणवीस यांनी तापी मेगा रिचार्जच्या योजनेवर प्रकाश टाकताना भाजपचे सरकार आल्यास ही योजना तडीस जाईल, असे आश्वासनदेखील दिले होते. छत्तीसगडमध्येदेखील फडणवीस यांच्या धमतरी, रायपूरमधील रोड शो व सभांना मोठा प्रतिसाद लाभला होता.

गडकरींकडून ‘डबल इंजिन’ची हाक
देशभरातील महामार्गांच्या जाळ्यामुळे गडकरी हे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये अगोदरपासूनच लोकप्रिय आहेत. विशेषत: छत्तीसगडमधील दुर्गम भागातील महामार्गदेखील रुळावर आणण्यावर गडकरी यांनी भर दिला होता. गडकरी हे निवडणुकांच्या घोषणेच्या अगोदरपासूनच सक्रिय होते. मध्य प्रदेशातील जनआशीर्वाद यात्रेत ते सहभागी झाले होते. तर प्रचारादरम्यान ते मुलताई, आमला, परासिया, सौंसर, इंदूर तर छत्तीसगडमधील रायपूर, धमतरी येथे मतदारांमध्ये गेले होते. गडकरी यांनी भाषणात टीका करण्यापेक्षा विकास आणि ‘डबल इंजिन’च्या फायद्यांवर भर दिला होता. गडकरी यांच्या व्हिजनचे मुद्दे सोशल माध्यमांवरील प्रचारातदेखील गाजले होते.

राजस्थानमध्येदेखील मराठी नेत्यांचा प्रभाव
गडकरी, फडणवीस यांचा राजस्थानमध्येदेखील प्रचारात प्रभाव दिसून आला. गडकरी व फडणवीस हे दोघेही भाजपतर्फे आयोजित परिवर्तन यात्रांचे नेतृत्व करताना दिसून आले होते. तसेच गडकरी यांनी जयपूर, बस्सी, विद्याधरनगर, तर फडणवीस यांनी पाली, सोजत, जैतारन, ब्यावर, नसिराबाद, अजमेर येथील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार केला होता. महाराणा प्रतापांच्या भूमीत भ्रष्टाचार शोभनीय नाही, असे वक्तव्य करत फडणवीस यांनी थेट मतदारांच्या हृदयालाच हात घातला होता. अजमेर येथे भर पावसात फडणवीस यांची प्रचारसभा चांगलीच गाजली होती.

जनतेचा विकासावर विश्वास : फडणवीस
या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना ‘लोकमत’ने संपर्क केला असता त्यांनी मराठी भाषकांचा भाजपला कौल मिळेल, याचा विश्वास होताच. जनतेने विकासाला मतदान केले असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मराठी भाषकांची संख्या जास्त असलेल्या भागात विदर्भातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात उतरले होते व अनेक भागांमध्ये पक्षाला यश मिळाल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली

Web Title: In Chhattisgarh, Madhya Pradesh, BJP leaders from Nagpur Nitin Gadkari, Devendra Fadnavis addressed Marathi voters.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.