लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विजयादशमीच्या दिवशी देशभरात गांधी जयंती साजरी होत असताना नागपुरातील रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभराव्या वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने संघ मुख्यालयावर संविधान भेट देण्याचा निर्णय घेतला असून, “मनुस्मृती नव्हे, संविधान देशाचे मार्गदर्शक” असा ठाम संदेश देण्यात येणार आहे.
बुधवारी नागपूरात पत्रकार परिषदेत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी ही घोषणा केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, शंभर वर्षांत संघाने कधीही संविधान मान्य केले नाही. सातत्याने संविधानाचा अपमान आणि पायमल्ली केली जात आहे. मनुस्मृतीच्या विचारांचा प्रचार करून समाजात द्वेष पेरला गेला. मात्र आज देशाला महात्मा गांधींच्या शांतता, समानता व बंधुभावाच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे आता संघानेही मनुस्मृती सोडून संविधान स्वीकारले पाहिजे. संविधान हेच या देशाचे तत्त्वज्ञान आहे हे मान्य केले पाहिजे असेही मोरे म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय महासचिव अजय छिकारा, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर विद्रोही, महासचिव अनुराग भोयर, महासचिव व प्रवक्ते कपिल ढोके, सचिव अक्षय हेटे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
गांधी जयंतीला प्रतीकात्मक आंदोलन
दीक्षाभूमी ते सेवाग्राम “संविधान सत्याग्रह यात्रा” काँग्रेसकडून काढण्यात आली असून, तिचा समारोप सेवाग्राम येथे होईल. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती युवक काँग्रेस कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केल्या जातील. त्यानंतर हे कार्यकर्ते अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या वातावरणात नागपूरच्या रेशीमबाग येथे पोहोचून संघ मुख्यालयावर संविधान भेट देणार असल्याचे मोरे म्हणाले.गांधी जयंतीला प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून गांधीवाद, समानता व संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यासाठी संविधान भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
परवानगी नाकारली तर पोष्टाने पाठविणार
पोलिसांनी संविधान भेद देण्याला परवानगी नाकारली तर तालुका व जिल्हा स्तरावरील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोस्टाने सरसंघचालकांना संविधानाच्या प्रती पाठविणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.
Web Summary : Youth Congress will gift the Constitution to RSS headquarters in Nagpur on Gandhi Jayanti, protesting RSS's alleged disregard for it. They claim RSS promotes Manusmriti and spreads hatred, urging them to adopt the Constitution.
Web Summary : युवा कांग्रेस गांधी जयंती पर नागपुर में आरएसएस मुख्यालय को संविधान भेंट करेगी, आरएसएस द्वारा कथित तौर पर इसे अस्वीकार करने का विरोध करेगी। उनका दावा है कि आरएसएस मनुस्मृति को बढ़ावा देता है और नफरत फैलाता है, उनसे संविधान अपनाने का आग्रह करता है।