नाट्यगृहांचा दर्जा सुधारणार
By Admin | Updated: November 12, 2016 03:01 IST2016-11-12T03:01:31+5:302016-11-12T03:01:31+5:30
मराठी नाटकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला अधिक समृद्ध केले आहे. नाटक हे समाजजागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे.

नाट्यगृहांचा दर्जा सुधारणार
मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कलारंग नाट्यमहोत्सवाचे थाटात उद्घाटन
नागपूर : मराठी नाटकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला अधिक समृद्ध केले आहे. नाटक हे समाजजागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे. परंतु या माध्यमासमोरही अनेक आव्हाने आहेत. नाटकासाठी प्रशस्त अन् सर्व सुविधायुक्त नाट्यगृह उपलब्ध नसणे हे त्यातील एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाकडून राज्यातील नाट्यगृहांचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शुक्रवारी वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय कलारंग नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री रिमा लागू, प्रशांत दामले, अरुण नलावडे व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सुरुवातीची दोन वर्षे नैसर्गिक दुष्काळाशी सामना करण्यातच निघून गेली. पण, यंदा पाऊसपाणी चांगले झाले आहे. इतर विषयांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ आहे. या वेळेचा लाभ सांस्कृतिक क्षेत्रासमोरील आव्हाने सोडविण्यासाठीही होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
यावेळी प्रेक्षकांमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई, विभागीय आयुक्त अनुपकुमार, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, माजी मंत्री रणजित देशमुख, नगरसेवक संदीप जोशी उपस्थित होते. दीपग गाडगे, संदीप बारस्कर व समीर पंडित यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाट्यमहोत्साची सुरुवात अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. यानंतर सादर झालेल्या नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राच्या पोवाड्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले. संचालन वृषाली देशपांडे यांनी केले. (प्रतिनिधी)