नागपुरात २ लाख ३१ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन : १६४ टन निर्माल्य गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:29 IST2018-09-25T22:27:44+5:302018-09-25T22:29:20+5:30
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही फुटाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने विविध भागातून १६४ टन निर्माल्य गोळा केले. यात विविध पर्यावरण, सामाजिक संघटनांसोबतच काही शाळा निर्माल्य गोळा करण्यासाठी सरसावल्या होत्या. गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. या तलावांत २ लाख ३१ हजार ५०१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़

नागपुरात २ लाख ३१ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन : १६४ टन निर्माल्य गोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही फुटाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने विविध भागातून १६४ टन निर्माल्य गोळा केले. यात विविध पर्यावरण, सामाजिक संघटनांसोबतच काही शाळा निर्माल्य गोळा करण्यासाठी सरसावल्या होत्या. गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. या तलावांत २ लाख ३१ हजार ५०१ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़
तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता ते कृत्रिम टँकमध्ये करावे, यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत २५१ कृत्रिम टँक उभारले होते़ काही ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी मोठे कलश ठेवण्यात आले होते. प्रत्येक तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले कलश निर्माल्याने भरले की लगेच महापालिकेतर्फे खाली केले जात होते. शहरातील सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, अंबाझरी या तलावांना तर चारही बाजूने टिनाचे कठडे व बॅरिकेडस् लावण्यात आले होते. शहरातील मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी फुटाळा आणि नाईक तलावावर परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे हे दोन तलाव वगळता नागपुरातील इतर तलावांत प्रदूषणमुक्त विसर्जन पार पडल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. फुटाळा तलाव व परिसरातून सर्वात जास्त निर्माल्य गोळा करण्यात आले.
९०० कर्मचारी व ८२ वाहनांचा ताफा
महापालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी यावर्षी ९०० कर्मचारी, ८२ वाहनांचा ताफा लावला होता़ पाच नियंत्रण अधिकारी, १० झोनल अधिकारी, ५६ निरीक्षक, १५१ जमादारही सज्ज होते़ कनक रिसोर्सेसचे २४६ कर्मचारी व ८२ वाहनेही या सेवेत होती़