नवोदय बँक घोटाळ्यातील फरार आरोपींची सचित्र यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:11+5:302021-04-11T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नवोदय बँक घोटाळ्यातील फरार आरोपींची सचित्र यादी आज शनिवारी शहर गुन्हे शाखेने जारी ...

नवोदय बँक घोटाळ्यातील फरार आरोपींची सचित्र यादी जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय बँक घोटाळ्यातील फरार आरोपींची सचित्र यादी आज शनिवारी शहर गुन्हे शाखेने जारी केली. अधिकाराचा दुरुपयोग करून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक धवड आणि संचालक मंडळातील काहींनी ठरावीक कर्जदारांशी संगनमत केले. या सर्वांनी २०१० ते २०१५ या कालावधीत गैरप्रकार करून ठेवीदारांच्या ३८ कोटी ७५ लाख २० हजार रुपयांची अफरातफर केली. जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांनी केलेल्या लेखा परीक्षणातून या घोटाळ्याचा भंडाफोड झाला आणि नंतर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक धवड यांच्यासह एकूण ३२ आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांत पोलिसांनी या प्रकरणी धवड यांच्यासह १६ आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित १६ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत माने आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखा पोलिसांनी फरार आरोपींपैकी १४ आरोपींची छायाचित्रांसह माहिती जारी केली आहे. (उर्वरित दोघांची माहिती कन्फर्म नसल्याचे समजते). त्यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंटही जारी करण्यात आले आहे. या आरोपींची माहिती (फोन नंबर ०७१२ - २५४४०२४) देणारांस योग्य बक्षीस देण्यात येईल, असेही असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. हे बक्षीस नेमके किती रुपयांचे आहे, ते पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
--- फरार आरोपींची नावे
सचिन रामदास मित्तल, प्रीती सचिन मित्तल (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, रामदासपेठ), विजय कैलास जोशी, मुकेश कैलास जोशी आणि राकेश कैलास जोशी (रा. शिल्पा हाउसिंग सोसायटी, मनीषनगर), गोविंद सुरेश जोशी (मनीषनगर), प्रकाश श्यामसुंदर शर्मा (पारडी), वीरेंद्र गजानन आवळे (रा. छत्रपतीनगर), मनीष किशनलाल गांधी, लीना बालकिशन गांधी (लाडीकर लेआऊट, मानेवाडा), सचिन हिरालाल कश्यप आणि पंकज हिरालाल कश्यप (रा. बेलतरोडी), गिरीश बाळासाहेब मंदाखलीकर (रा. अश्वमेध अपार्टमेंट, रामदासपेठ) आणि राहुल पवनकुमार ओझा (रा. कीर्ती अपार्टमेंट, नंदनवन).
-----