पायोनियर वूड्स सोसायटीत वसतिगृहाचे अवैध बांधकाम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:49+5:302021-02-09T04:10:49+5:30

वानाडोंगरी : येथील पायोनियर सोसायटीमध्ये बिल्डरने ओपन स्पेसमध्ये अवैधरीत्या होस्टेलचे बांधकाम सुरू केल्याचा आरोप पायोनियर वूड्स सोसायटीच्या रहिवाशांनी केला ...

Illegal construction of hostel in Pioneer Woods Society? | पायोनियर वूड्स सोसायटीत वसतिगृहाचे अवैध बांधकाम?

पायोनियर वूड्स सोसायटीत वसतिगृहाचे अवैध बांधकाम?

वानाडोंगरी : येथील पायोनियर सोसायटीमध्ये बिल्डरने ओपन स्पेसमध्ये अवैधरीत्या होस्टेलचे बांधकाम सुरू केल्याचा आरोप पायोनियर वूड्स सोसायटीच्या रहिवाशांनी केला आहे. वानाडोंगरी नगर परिषद प्रशासनाचा बिल्डरला आशीर्वाद असल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. सदर बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे, या मागणीसाठी पायोनियर वूड्स सोसायटीमधील रहिवाशांनी बांधकामाला विरोध दर्शवीत सोमवारी येथून मजुरांना पिटाळून लावले. यानंतर सोसायटीमधील रहिवाशांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची व्यथा मांडली. पायोनियर वूड्स सोसायटीमध्ये फेस-१ प्रोजेक्टमध्ये १०५ तर फेस-२ मध्ये १६७ असे एकूण २७२ फ्लॅट्स आहेत. फ्लॅट्स विकताना बिल्डरने दोन एसटीपी दोन प्रोजेक्टसाठी स्वतंत्र राहतील, असे सांगितले होते. मात्र यातील एकच एसटीपी सुरू करण्यात आला. जवळपास दोन लाख लिटर पाण्याचा निचरा रोज या स्कीममधून होत आहे. याची विल्हेवाटसुद्धा बिल्डरने लावली नाही. सोसायटीमधील खुल्या जागेत अवैधरीत्या वानाडोंगरी नगर परिषद प्रशासनाची परवानगी घेऊन मुलांच्या वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. याबाबतची तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. यानंतरही बिल्डरने बांधकाम सुरूच ठेवले. सदर अवैध बांधकामाला तत्कालीन मुख्याधिकारी भगत यांनी नियमांना बगल देत परवानगी दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पत्रपरिषदेला पायोनियर वूड्स सोसायटीचे अध्यक्ष भूषण विधाले, पदाधिकारी हनीश जैन, संजय मदनकर, संदीप भुसारी, शोभा बुधे, प्रवीण कावडे, कल्पना अतकरे, धीरज नागदेवते आदी रहिवासी उपस्थित होते.

अ‍ॅमिनिटी स्पेस आणि पब्लिक युटीलिटीची जागा सोसायटीच्या वापरासाठी राहील असे बिल्डरने रजिस्ट्रीवेळी लिहून दिले होते. आज या ठिकाणी हेस्टेल बनवून बिल्डर पुन्हा व्यवसाय करीत आहे. याचा आम्ही विरोध करतो. वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागू.

- भूषण विधाले

अध्यक्ष, पायोनियर सोसायटी वानाडोंगरी

--

सोसायटीमध्ये वसतिगृहाचे बांधकाम खुल्या जागेत सुरू नाही. सर्व परवानग्या घेऊनच वसतिगृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पायोनियर सोसायटीमधील समितीने यापूर्वी सगळीकडे तक्रारी केल्या. माहितीच्या अधिकारात बिल्डरकडून कागदपत्रेही मागविली. सोसायटीला सर्व वस्तुस्थिती माहीत असतानाही विनाकारण बिल्डरला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. बांधकामाला विरोध करण्यापेक्षा त्यांनी न्यायालयात धाव घ्यावी.

सुधीर अलोणी

व्यवस्थापक, पायोनियर वूड्स बिल्डर्स

Web Title: Illegal construction of hostel in Pioneer Woods Society?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.