अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार
By Admin | Updated: January 5, 2015 00:51 IST2015-01-05T00:51:12+5:302015-01-05T00:51:12+5:30
दाभ्यातील अवैध दारू विक्रेत्यांना वठणीवर आणण्यासाठी गावातील महिला सरसावल्या आहेत. त्यांनी दारू पकडण्याचा सपाटा लावल्यामुळे दारू विक्रेते तर हादरलेच. पोलिसही आता महिलांच्या

अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार
महिला समितीची स्थापना : मोठा दारूसाठा जप्त
नागपूर : दाभ्यातील अवैध दारू विक्रेत्यांना वठणीवर आणण्यासाठी गावातील महिला सरसावल्या आहेत. त्यांनी दारू पकडण्याचा सपाटा लावल्यामुळे दारू विक्रेते तर हादरलेच. पोलिसही आता महिलांच्या मदतीची भाषा करू लागले आहे.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा वस्ती आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू गाळली जाते. ठिकठिकाणी या दारूचा पुरवठा केला जातो. कुठे नाही मिळाली तरी दाभ्यात हमखास दारू मिळते. सहज आणि स्वस्तात २४ तास दारू उपलब्ध असल्यामुळे या वस्तीत दारूड्यांची नेहमी वर्दळ असते. त्यातून शिवीगाळ, हाणामाऱ्याही होतात. गावातील काही म्हातारे आणि प्रौढच नव्हे तर तरुणही दारूच्या आहारी जात आहेत. परिणामी घराघरात कलह वाढला आहे. गिट्टीखदान ठाण्यात माहिती दिल्यानंतर कारवाई होते. मात्र. ती जुजबी स्वरूपाची असल्यामुळे दारू विक्रेते कमालीचे निर्ढावले आहेत. इकडे तरुण मुले व्यसनाधीन होत असल्यामुळे दारू विक्रेत्यांना वठणीवर आणण्यासाठी दाभ्यातील महिलाच पुढे सरसावल्या. डॉ. नयना धवड यांच्या नेतृत्वात मंगला सोमकुंवर, छाया पाटील, कांता पाटील, सुलोचना देशभ्रतार, चंद्रकला हिवरकर, मायाताई कावळे, ललिता शेडामे, रेखा चिमोटे, माला फुले यांनी ‘दाभा महिला समिती’ स्थापन केली. या समितीला राहुल गौरखेडे, प्रकाश राऊत, फॉरवर्ड ब्लॉकचे अरुण वनकर, सुनील चोखारे, संजीवन वालदे तसेच आॅल इंडिया वर्कर्स कौन्सिलचे दीपक शेडामे, मंगेश मेश्राम, अनिल पाल, दादू मेश्राम यांनीही पाठबळ दिले. त्यामुळे ३१ डिसेंबरपासून दारू पकडून पोलिसांच्या हवाली करण्याचा सपाटा या मंडळींनी लावला आहे. महिला आक्रमक झाल्यामुळे आता पोलिसांनीही दारू विक्रेत्यांविरुद्ध जप्ती आणि अटकेची कारवाई चालवली आहे.(प्रतिनिधी)