‘आयआयएम-एन’ देशातील सर्वोत्कृष्ट संस्था होणार
By Admin | Updated: July 27, 2015 03:25 IST2015-07-27T03:25:56+5:302015-07-27T03:25:56+5:30
आपल्या देशातील विद्यार्थ्यांकडे प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला दिशा देण्याची दर्जेदार संस्थांची जबाबदारी आहे.

‘आयआयएम-एन’ देशातील सर्वोत्कृष्ट संस्था होणार
नागपूर : आपल्या देशातील विद्यार्थ्यांकडे प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला दिशा देण्याची दर्जेदार संस्थांची जबाबदारी आहे. ‘आयआयएम-एन’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट-नागपूर) नवीन असले तरी येत्या काळात देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून याचे नाव घेण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘आयआयएम-एन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या पहिल्या बॅचमध्ये देशातील ५७ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला असून पहिल्या सत्राची सुरुवात झाली आहे.
चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘आयआयएम-अहमदाबाद’चे संचालक डॉ. आशिष नंदा, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. विश्राम जामदार प्रामुख्याने उपस्थित होते.
‘आयआयएम-एन’आल्यामुळे विदर्भासोबत महाराष्ट्रातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. भारतातील ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’सारख्या संस्था तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आघाडीवर आहे आणि हीच आज देशाची गरज आहे.
जागतिक पातळीवर मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘आयआयएम-एन’च्या येण्यामुळे मिहानच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे.
विद्यार्थीच ‘यूएसपी’
४महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ असल्यामुळे याच्या उद्घाटनप्रसंगी राज्यातील उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर येतील, अशी अपेक्षा होती. याबाबत डॉ. आशिष नंदा यांना विचारणा केली असता उद्घाटनाच्या वेळी आमच्यासाठी विद्यार्थी जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर अनेकदा मान्यवर ‘आयआयएम-एन’ला येतील. परंतु प्रत्यक्षात हा क्षण विद्यार्थ्यांचा आहे, असे ते म्हणाले. उद्घाटनानंतर त्यांनी व्यक्तिश: विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.