सन्मान होत नसेल तर मार्ग मोकळा : रामदास आठवलेंचा भाजपला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:49 IST2019-02-23T21:48:52+5:302019-02-23T21:49:56+5:30
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.

सन्मान होत नसेल तर मार्ग मोकळा : रामदास आठवलेंचा भाजपला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.
भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा केली. जागा वाटपही जाहीर केले. परंतु यात मिंत्र पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपाइंसाठी मात्र एकही जागा सोडली नाही किंवा त्यांना साधी विचारणाही केली नाही. यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कमालीचे नाराज असून त्यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपला संताप जाहीरपणे व्यक्त केला. नागपुरात सुरु असलेल्या नाट्य संमेलनासाठी ते आले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजप-शिवसेना युती व्हावी, अशी आपली सुरुवतीपासूनच इच्छा होती. ती झाली त्याचा आनंद आहे. परंतु आम्हाला साधी विचारणाही केली नाही, हे बरोबर नाही. लोकसभेमध्ये आम्हाला किमान एक जागा मिळेल, अशी अपेक्षा होती. मी स्वत: दक्षिण-मध्य मुंबई येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. देशभरातील कार्यकर्ते व लोक मला विचारत आहेत. त्यांना काय उत्तर देणार, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी उपरोक्त इशारा दिला. शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारणा केली असता आठवले म्हणाले, मी शरद पवार यांची भेट घेतली नाही. भेट घ्याचीच झाली तर उघडपणे घेणार. छगन भुजबळ यांनी आपल्याला भेटण्याबाबत विचारणा केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, राजन वाघमारे, बाळू घरडे, राजू बहादुरे, विनोद थुल, सतीश तांबे आदी उपस्थित होते.
पाकिस्तानसोबत आरपारची लढाई व्हावीच
पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक आहे. त्याच्याशी एकदा आरपारची लढाई झालीच पाहिजे. नितीन गडकरी यांनी पाकिस्तानाचे पाणी अडवले, त्याचे स्वागत करीत केवळ पाणीच नव्हे तर पाकिस्तानसोबतचे क्रिकेटही बंद झाले पाहिजे. सैन्य दलात आरक्षण लागू करण्यात यावे, अशी आपल्या पक्षाची मागणी आहे. दलित युवकांनीही सैन्यात भर्ती व्हावे, असे आवाहनही आठवले यांनी केले.