तूर वाळतेय तर चणा पिवळा पडतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:32+5:302021-01-08T04:22:32+5:30
सौरभ ढोरे काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे ...

तूर वाळतेय तर चणा पिवळा पडतोय !
सौरभ ढोरे
काटोल : अति पावसामुळे खरीप हंगामात काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता ढगाळ वातावरण व पहाटे पडणाऱ्या धुक्क्याचा फटका रबी पिकांना बसतो आहे. तालुक्यात बहुतांश भागात तुरीचे पीक सोकाटल्याचे दिसून येत आहे. रबी हंगामातील चणा पिकावरही याचा परिणाम दिसून येत आहे. चणा पीक पिवळे पडायला लागले आहे. यासोबतच भाजीपाल्यावर वातावरणीय बदलाचा फटका बसताना दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत काटोल तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र अधिक होते. अतिवृष्टीने मात्र सर्वत्र नुकसान झाले. हंगामातील शेवटचे पीक तूर तारेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र तसे होताना दिसत नाही. तालुक्यात ५,६३६ हेक्टर क्षेत्रात तूरीची लागवड करण्यात आली होती. मात्र जमिनीतील अति ओलाव्यामुळे तूरीने पाहिजे तसा जोम धरला नाही. काही ठिकाणी उशिरा लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रात आता ढगाळ वातावरणाचा फटका बसतो आहे. यंदा तालुक्यात १३,७४२ हेक्टरमध्ये रबीचा पेरा झाला आहे. यात गहू ७५७५ हेक्टर, हरभरा ५७०५ हेक्टर तर मका १२३ हेक्टर क्षेत्रात आहे. भाजीपाल्याची लागवड ३३८ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. यातील हरभरा (चणा) पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. पहाटेच्या धुक्यामुळे चणा पिवळट पडायला लागला आहे.
कीटनाशकाची फवारणी करा
काही भागातील तूर आता कापून बाजूला झाली आहे. मात्र ज्यांचे पेरे उशिरा झाले त्या पिकांना वातवरणीय बदलाचा फटका बसत आहे. अशी स्थितीवर तुरीवर उपाय शक्य नाही. चण्यावर ढगाळ वातावरणाने व धुक्यामुळे घाटे अळी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजवर असल्याचे समजते . त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच पिकावर कीटकनाशक फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.