ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास डॉक्टरांनी रुग्णाला कोविड हॉस्पिटलला पाठवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:47 IST2020-08-14T23:45:28+5:302020-08-14T23:47:38+5:30
खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण दाखल होतेवळी रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास त्या रुग्णाला शासकीय किंवा खासगी कोविड हॉस्पिटलला तात्काळ पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास डॉक्टरांनी रुग्णाला कोविड हॉस्पिटलला पाठवावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. साधारणत: ७० टक्के जवळपास मृत्यू हे वेळेत निदान न झाल्याने, भीतीपोटी, ताप, खोकला किंवा लक्षणे लपवून ठेवल्याने झाल्याचे आढळले आहे. खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण दाखल होतेवळी रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास त्या रुग्णाला शासकीय किंवा खासगी कोविड हॉस्पिटलला तात्काळ पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.
नागपूर ग्रामीण येथील तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत ते बोलत होते. तेथील कोविड कंट्रोल रूमला त्यांनी भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यावेळी उपस्थित होते. खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करतेवेळी रुग्णाची मेडिकल हिस्ट्री घ्यावी. रुग्णाची अॅन्टिजेन टेस्ट करावी. अॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरपीसीआर टेस्ट करावी. कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्यांच्या तपासणीला प्राथमिकता द्यावी. अॅन्टिजेन टेस्ट करतेवेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीमदेखील सोबत ठेवावी.
यानंतर बुटीबोरी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबतदेखील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत चर्चा केली. पुढील दोन ते अडीच महिने अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर संवाद यात्रेचे आयोजन करण्याची सूचनाही केली. नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, तहसीलदार मोहन टिकले यावेळी उपस्थित होते.