भाजपला नागरिकांची खरच चिंता असेल तर सर्वांचे बिल भरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:00+5:302021-02-06T04:14:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपला खरेच नागरिकांची चिंता असेल तर त्यांनी सर्व ग्राहकांचे विजेचे बिल भरावे, या शब्दात ...

भाजपला नागरिकांची खरच चिंता असेल तर सर्वांचे बिल भरावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपला खरेच नागरिकांची चिंता असेल तर त्यांनी सर्व ग्राहकांचे विजेचे बिल भरावे, या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपने केलेल्या वीज बिलावरोधातील आंदोलनावर चिमटा काढला. तसेच भाजपचे हे आंदोलन पूर्णपणे फसल्याचे सांगितले.
भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत बोलताना राऊत म्हणाले, लोकांचा भाजपवरून विश्वास उडालेला आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भाजप आंदोलन करीत आहे. परंतु वीज बिलाविरोधात भाजपने केलेले आंदोलनही फसले आहे. कारण त्यांना नागरिकांची साथ मिळालेली नाही. आतापर्यंत ७९ टक्के ग्राहकांनी आपले वीज बिल भरलेले आहे. मार्चपर्यंत थकबाकी समाप्त होईल, अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले, मार्च २०१४ मध्ये १४,१५४ कोटी रुपये महावितरणची थकबाकी होती. भाजपच्या कार्यकाळात मार्च २०१९पर्यंत ही थकबाकी ४१,१३३ कोटी रुपयावर गेली. कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडल्याने थकबाकी वाढून ७१,५०६ कोटीवर केली. महावितरण खासगी हातात विकण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक थकबाकी वाढू दिल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातही याबाबतचे संकेत दिसून येतात, असेही त्यांनी सांगितले.
राऊत म्हणाले, अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कोळसा, तेल आदी खरेदी करावे लागते. कोरोनाच्या काळात नागरिकांना वीज बिलात सवलत देण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे १० हजार कोटी रुपयाची मागणी केली होती. परंतु केंद्राने कुठलीही मदत केली नाही. आज भाजप वीज बिलावरून आंदोलन करीत आहे. परंतु दर दिवशी होत असलेल्या पेट्रोल -डिझलेच्या दरवाढीवर मात्र ते काही बोलत नाही. कोराेना काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महावितरणच्या अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. नागरिकांनीही ही बाब लक्षात घेऊन वीज बिल भरावे, असे आवाहन त्यांनी केले.
बॉक्स
सुलभ हप्त्याची सुविधा
ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, थकीत वीज बिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना तीन महिन्याची सुलभ हप्त्याची सुविधा दिलेली आहे. यातही कुणी गरजू ग्राहकाला अधिकचा हप्ता हवा असेल व त्याने तशी मागणी केली असेल तर त्यावर सहानुभुतीपूर्वक विचार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.