मला हेलिकॉप्टरने येऊन निवडणूक अर्ज भरायचाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:24 IST2019-09-26T23:22:34+5:302019-09-26T23:24:56+5:30
एका भावी उमेदवाराला विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने यायचंय.या भावी उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज करून परवानगी मागितली आहे.

मला हेलिकॉप्टरने येऊन निवडणूक अर्ज भरायचाय!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका भावी उमेदवाराला विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने यायचंय. विशेष म्हणजे खूप दूरून नाही. तर तीन ते चार किमी अंतरावरून यायचे आहे. आश्चर्य वाटेल, परंतु ही गोष्ट खरी आहे. तसेही स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी उमेदवार काहीही करतात. असाच काहीसा प्रकार नागपुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यासाठी या भावी उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज करून परवानगी मागितली आहे.
या उमेदवाराला उत्तर नागपुरातून उमेदवारी अर्ज भरायचा आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टरने यायचे आहे. इंदोरा चौक येथून हेलिकॉप्टरने दीक्षाभूमीवर पुष्पप्वृष्टी करायची व नंतर कस्तूरचंद पार्कवर हेलिकॉप्टर उतरवण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी त्यांनी रीतसर परवानगी मागितली आहे. उमेदवाराला ३ ते ४ तारखेला निवडणुकीचा अर्ज भरायचा आहे. यासाठी एनओसी आवश्यक असून ते पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहेत.
मुंबईहून येणार हेलिकॉप्टर
या उमेदवारांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांना पक्षाचे तिकीट निश्चितच मिळणार आहे. केवळ पक्षाच्या एबी फॉर्मची प्रतीक्षा आहे. हेलिकॉप्टरसाठी ते एका कंपनीशी चर्चा करीत आहेत. मुंबईवरून ते हेलिकॉप्टर येणार आहेत. निवडणूक आयोगाने २८ लाख रुपयापर्यंत खर्च करण्याची परवानगी दिली आहे. सर्व खर्च या सीमेतच केला जाईल.