‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’
By Admin | Updated: June 30, 2014 00:46 IST2014-06-30T00:46:50+5:302014-06-30T00:46:50+5:30
मित्र मंडळाच्यावतीने सध्या समाजात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचार व छेडखानीसारख्या घटनांना आळा घालून जनजागृती करण्याच्या हेतूने ‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’
मित्र मंडळाचा उपक्रम : फुटाळा चौपाटी येथे शुभारंभ
नागपूर : मित्र मंडळाच्यावतीने सध्या समाजात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचार व छेडखानीसारख्या घटनांना आळा घालून जनजागृती करण्याच्या हेतूने ‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या अभियानाचा रविवारी फुटाळा चौपाटी येथे शुभारंभ करण्यात आला. ‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’ असा संदेश लिहिलेल्या पांढऱ्या टी-शर्ट मधील शेकडो तरुण-तरुणींनी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये महिला सुरक्षेचा संदेश दिला. शिवाय आय रिस्पेक्ट गर्ल्स (आयआरजी) असे लिहिलेल्या लाल रंगाच्या स्टिकरचेही वाटप करण्यात आले. या अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष मृण्मय गोखले म्हणाले, गत दोन-तीन वर्षांत समाजात महिलांवरील अत्याचार व छेडखानीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आज प्रत्येक महिला स्वत:ला असुरक्षित समजू लागली आहे. अशा स्थितीत महिलांमध्ये अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस व आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे. आजपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, यात पुढील टप्प्यात मुला-मुलींसाठी कार्यशाळा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात मंडळाचे सचिव मैयुरेश गोखले, अमृता संगावार, किरण संगावार, रोशन लिखार, जगन वैद्य व शुभम कुलकर्णी यांच्यासह शेकडो तरुण-तरुणींनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)